Ahilyanagar News :दोन गटात हत्याराने हाणामाऱ्या , दोघे गंभीर, अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील घटना…

Published on -

दोन गटांमध्ये तुफान हाणामारी होत २ जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात बुधवार दि.२७ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

नुकतेच कोपरगाव शहरातील आयटीआय कॉलेज जवळ काही किरकोळ कारणाने दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनंतर शहरातील मोहनीराज नगर भागामध्ये पुन्हा एकदा दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा दोन गटांमध्ये काही कारणास्तव हाणामारी झाली.

या हाणामारीत लाकडी दांडके, काही लोखंडी बनावटीची हत्यारे घटनास्थळी दिसून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सदर घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यातील एका गटाकडून अतुल देविदास आव्हाड, रा. गजानननगर यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी कालू आप्पा, सोन्या आव्हाड, सागर पंडोरे, शुभम आढाव, नितीन हमरे, अविनाश गीते, अंकुश सोनू बोडखे तसेच इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटाकडून अनिल विनायक आव्हाड, रा. मोहनीराजनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतुल आव्हाड आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाणामारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी दोन्ही गटांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर मोहनीराज नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत असून लवकरच या हाणामारीमागील कारण उघड होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

कोपरगाव शहरामध्ये याप्रकारे हाणामारीचे प्रकार वाढत असून पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याचे यावेळी बोलले जात आहे. हाणामारी होतात व किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन पुढील गुन्ह्यात तेच आरोपी सक्रिय होतांना दिसत आहेत. त्यामुळे या प्रकराच्या गुन्ह्याना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने कडक कारवाई करून वचक निर्माण करणे गरजेचे झाले आहे.

शहरात काही गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या स्वरूपात दहशत निर्माण करून या प्रकारे खुल्या पध्दतीने हत्यारे वापरण्यात येत असतील तर नक्कीच कोपरगाव शहरामध्ये मोठ्या स्वरूपाची गुन्हेगारी वाढू शकते. मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोपरगाव तालुक्यात दहशत वाढू शकते, अशी शक्यता सुज्ञ नागरिकांकडून वर्तवली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe