अहिल्यानगरमध्ये अनेक धरणे आहेत. दरम्यान एका मोठ्या धरणाच्या दगडी भिंतीतून सातत्याने पाणी पाझरून गळती होत आहे. ही भविष्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. हे आहे अकोले तालुक्यातील आढळा धारण. या धरणाच्या विमोचकासाठी असलेल्या दगडी भिंतीतून सातत्याने पाणी पाझरून गळती होत आहे.
जलसंपदा विभागाने याप्रकरणी स्थापत्य अभियांत्रिकी तज्ज्ञांकडून धरणाच्या सुरक्षिततेची पाहणी करावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षापूर्वीचे हे मातीचे धरण आहे. धरणाच्या भिंतीची महत्तम उंची १३१ फूट तसेच लांबी दोन हजार ४४ फूट आहे. सिंचन विमोचकाच्या काही भागात दगडी बांधकामातून पाण्याच्या धारा बाहेर येतात. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात पाण्याची पातळी महत्तम असते.

तेव्हा पाणी पाझरू शकते. मात्र, येथे धरण भरल्यापासून थेट अखेरचे आवर्तन संपेपर्यंत पाण्याच्या चिळकांड्या उडतात. ही बाब कालांतराने गंभीर ठरू शकते. आताची पाण्याची गळती धोक्याची घंटाच असल्याचे जाणकार सांगतात. धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजा शेजारी दगडी बांधकामातून अनेक ठिकाणी पाण्याची चिंताजनक गळती सुरू आहे. अनेक वर्षापासूनच्या पाझराचे रुपांतर आता लहानशा धबधब्यामध्ये झाल्याचे दिसून येते.
ठिकठिकाणच्या अनेक छिद्रांमधून एकत्रितपणे सुमारे एक क्युसेक वेगाने पाण्याची गळती होत असल्याचे दिसून येते. १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण भरल्यापासून सातत्याने पाण्याची गळती व भिंतीच्या बांधकामाची झीज होत असते. या दगडी बांधकामावरही झाडा-झुडडपांची वाढ होत आहे. मात्र, या ठिकाणी जलसंपदा विभागाने अद्यापही देखभालीसाठी प्रयत्न केलेले नाहीत.
गंभीर बाब ठरेल !
१ क्युसेक वेगाने अनेक छिद्रांमधून पाणी गळती सुरु आहे. यामुळे धरणातील पाणी साठा तर कमी होतोच. परंतु धरणाच्या भिंतीला यामुळे धोका पोहचू शकतो. ही गंभीर बाब आहे. याबाबत उपाययोजना आवश्यक आहे.