अहिल्यानगर : कोणत्याही रुग्णाला उपचारांअभावी जीव गमवावा लागू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळण्याची हमी देण्यात आली आहे.
जिल्ह्यासाठी ४१ लाख ६५ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १७ लाख नागरिकांनी हे कार्ड काढले असले, तरी अनेकांनी अद्याप याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत उपचारांचा लाभ घेता येणार नाही, ही चिंतेची बाब बनली आहे.

सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांना गंभीर आजारांवर उपचार घेणे परवडत नाही. अशा परिस्थितीत खर्चिक उपचारांअभावी रुग्णांचा आजार वाढतो आणि काही वेळा मृत्यूलाही सामोरे जावे लागते. ही समस्या सोडवण्यासाठी आयुष्मान भारत योजना आली.
या योजनेंतर्गत कार्डधारकांना खासगी आणि शासकीय रुग्णालयांत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. केंद्र सरकारने या योजनेची मुदत डिसेंबर २०२५ पर्यंत ठेवली आहे. या कालावधीत कार्ड न काढणाऱ्यांना भविष्यात मोफत उपचारांसाठी अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरिकांनी तातडीने कार्ड काढणे आवश्यक आहे.
आयुष्मान कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना योजनेत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या आजारांवरही मोफत उपचार मिळतात. या योजनेंतर्गत १३५६ प्रकारच्या आजारांवर उपचारांचा समावेश आहे, ज्याचा खर्च शासन उचलते.
कर्करोग, हृदयविकार, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचा यात समावेश आहे. हे कार्ड सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत असून, आर्थिक संकटातही उपचारांची चिंता दूर करते. मात्र, याचा लाभ घ्यायचा असेल तर नागरिकांना स्वतः पुढाकार घेऊन कार्ड काढावे लागेल, अन्यथा गंभीर आजारांतही त्यांना खर्च स्वतः करावा लागेल.
आयुष्मान कार्ड काढण्यासाठी फारशी कागदपत्रे लागत नाहीत. रेशनकार्ड आणि आधारकार्ड ही दोनच कागदपत्रे पुरेशी आहेत. याशिवाय आधार कार्डशी मोबाइल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया सोपी असून, ग्रामपंचायतीतील ‘आपले सरकार सेवा केंद्र’, आशा सेविका, आयुष्मान भारत योजनेशी संलग्न रुग्णालये आणि आता रेशन दुकानांमध्येही कार्ड काढता येते. तरीही जिल्ह्यातील ४१ लाखांपैकी फक्त १७ लाख नागरिकांनीच हे कार्ड काढले आहे, हे आश्चर्यकारक आहे.
‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ ही योजना गरीब आणि गरजू रेशनकार्डधारकांसाठी विशेष आहे. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड न देता उपचार मिळू शकतात. परंतु, अजूनही २४ लाखांहून अधिक नागरिकांनी कार्ड काढले नसल्याने त्यांच्यासमोर मोफत उपचारांचा लाभ घेण्याचे दरवाजे बंद होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तर नागरिकांनीही स्वतःच्या आरोग्यासाठी पुढाकार घेऊन ही संधी सोडू नये. डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत लक्षात घेता, वेळीच कार्ड काढणे हाच शहाणपणाचा मार्ग ठरेल.