अहिल्यानगर- नगर परिसरात सामान्य नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच भूखंड बळकावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत नरेश कोडम या पोलीस कर्मचाऱ्याने अन्य दोन व्यक्तींनी मिळून एका नागरिकाच्या नावावर असलेला भूखंड खोट्या संमतीपत्राद्वारे बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोट्या संमतीपत्राच्या आधारे दिशाभूल
फिर्यादी अश्रू यादव नरोटे हे लक्ष्मीनगर, अहिल्यानगर येथील रहिवासी असून जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा एक मोक्याचा भूखंड लक्ष्मीनगरमध्ये आहे.
आरोपी नरेश विष्णुपंत कोडम, जयश्री नरेश कोडम आणि रूपेश प्रकाश कोडम यांनी हा भूखंड मिळवण्यासाठी खोटे संमतीपत्र तयार करून न्यायालयात दावा दाखल केला. यामध्ये खोट्या साक्षी व पुरावे सादर करून भूखंड बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
न्यायालयात खोटी साक्ष
नरेश कोडम हा पोलिस खात्यात कार्यरत आहे, तर जयश्री व रूपेश कोडम हे देखील सरकारी नोकरीत आहेत. आरोपींनी खोट्या शपथपत्रात न्यायालयाला दिले की, ते संबंधित वेळी राहाता येथे हजर होते. प्रत्यक्षात ते दोघेही नोकरीच्या ठिकाणी उपस्थित होते, असा खुलासा न्यायालयात सादर करण्यात आला.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
फिर्यादीच्या वकिलांनी हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या बाजूने अॅड. गोरक्ष पालते व त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. सदर प्रकारामुळे पोलिस खात्याच्या प्रतिमेला धक्का बसला असून, अधिक तपास अपेक्षित आहे.