अहिल्यानगर हादरलं ! घटस्फोटासाठी १० लाखांची मागणी; तरुणाच्या आत्महत्येने खळबळ

Published on -

आश्वी (ता. संगमनेर) येथे एका तरुणाने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “घटस्फोट हवा असेल, तर दहा लाख रुपये दे; अन्यथा जीव घेऊ,” अशा धमक्या पत्नी आणि सासरच्या मंडळींनी दिल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. विजय जोशी (वय २८, रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्याच्या पत्नी पूजासह सासरा, सासू आणि मेव्हण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय जोशी आणि पूजा यांचा विवाह १९ जून २०२२ रोजी खांबे (ता. संगमनेर) येथे झाला होता. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, मात्र काही काळानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर, ३ मे २०२४ रोजी पूजाचे वडील हरिभाऊ जोरी हे मुलीला घरी घेऊन गेले. त्यानंतर पूजाने विजयला घटस्फोटासाठी बोलावून मोठी रक्कम मागितली.

दोन्ही कुटुंबांच्या संमतीने अडीच लाख रुपये देऊन कायदेशीर घटस्फोट घ्यायचा ठरले. विजय आणि पूजाने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दाखल केला. मात्र, २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अंतिम सुनावणीच्या दिवशी पूजा कोर्टात हजर राहिली नाही. त्याऐवजी तिने अचानक दहा लाख रुपयांची मागणी केली.

घटस्फोटाच्या मागणीसाठी पैशांवरून होत असलेल्या दबावामुळे तणावाखाली असलेल्या विजयने अखेर १७ मार्च २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. आई संगीता जोशी यांनी याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पत्नी पूजा, तिचे वडील हरिभाऊ पांडुरंग जोरी, आई मंदा हरिभाऊ जोरी आणि भाऊ प्रसाद हरिभाऊ जोरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येच्या या गंभीर प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, मृताच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विजयच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली असून, पैशांसाठी होत असलेल्या मानसिक छळाचा हा आणखी एक दुर्दैवी प्रसंग समोर आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe