Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याच्या पोलिस प्रशासनात मोठा बदल घडला असून, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबई येथे उपआयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांनी गुरुवारी राज्यातील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला. या बदल्यांमुळे अहिल्यानगरच्या पोलिस प्रशासनात नव्या दिशेने कामाला सुरुवात होणार आहे.

सोमनाथ घार्गे यांचे श्रीरामपूरला पोलिस उपअधीक्षक म्हणून काम
सोमनाथ घार्गे यांनी यापूर्वी श्रीरामपूर येथे 2008 ते 2009 या कालावधीत पोलिस उपअधीक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दरोडा प्रतिबंधक पथकाचे नेतृत्व केले आणि पापड्या काळ्या टोळीचा पर्दाफाश करून गुन्हेगारीला आळा घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्थापन केलेल्या या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर प्रभावी कारवाई केली होती. विशेषतः अण्णा लष्करे गॅगवारच्या काळात घार्गे यांनी खमकी भूमिका घेत टोळीच्या कारवायांना आळा घातला. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांनी पोलिस दलात आपली वेगळी ओळख निर्माण केली. घार्गे यांचा अनुभव आणि त्यांची गुन्हेगारीविरोधी रणनीती यामुळे ते अहिल्यानगरच्या पोलिस प्रशासनासाठी योग्य निवड मानली जात आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात ओला यांची महत्वाची भूमिका
राकेश ओला यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्य कार्यकाळ ऑक्टोबर 2024 मध्ये पूर्ण झाला. या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करत अनेक आरोपींना अटक केली. खून, दरोडे यासारख्या गुन्ह्यांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आणि कमी वेळेत आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले. त्यांनी महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (MCOCA) गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाया केल्या. याशिवाय, अमली पदार्थविरोधी मोहिमेला गती देत जिल्ह्यातील ड्रग्सच्या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ओला यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
घार्गे यांच्यासमोरील आव्हाने
सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती ही अहिल्यानगरच्या पोलिस प्रशासनासाठी नव्या संधी आणि आव्हानांचा कालावधी ठरणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण प्रदान करणे हे त्यांच्यासमोरील प्रमुख उद्दिष्ट असेल. राकेश ओला यांनी स्थापित केलेली कठोर प्रशासकीय पकड आणि गुन्हेगारीविरोधी धोरणे पुढे नेण्याची जबाबदारी आता घार्गे यांच्यावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर पोलिस दल नव्या उर्जेने कार्यरत होईल, अशी आशा आहे.