नगरमधील प्रसिद्ध व्यापाऱ्याचा एका बडतर्फ पोलिसानेच खून केल्याची घटना समोर आलीये. या व्यापाऱ्यानेच आधी या बडतर्फ पोलिसाला काही उधारी वसूल करण्याचे काम दिले. परंतु ते काम डोईजड झाले अन त्याने या व्यापाऱ्याचेच अपहरण करत १० कोटींची खंडणी मागितली अन निर्घृण खून केला. त्याच झालं असं, दिपक लालसिंग परदेशी हे व्यापारी बेपत्ता होते.
तोफखाना पोलीस त्यांच्या शोध घेत असताना सीसीटीव्हीत एक संशयास्पद कार दिसून आली की जी परदेशी यांच्या मागावर होती. ही कार किरण बबन कोळपे हा वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो एक बडतर्फ पोलीस आहे. अन त्याच्यानंतर सुरु झाला सगळा चोर पोलिसांचा खेळ.

पोलिसांनी किरण बबन कोळपे व त्याचा साथिदार सागर मोरे याना ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशीत मोठे थरारक सत्य समोर आले. दीपक परदेशी यांनी काही लोकांना पैसे उसने दिले होते.
त्या पैशांचे वसुलीचे काम मोरे व कोळपे यांच्याकडे त्याने दिले होते. परदेशी याने या दोघांना उधारी दिलेल्या लोकांपकी काहींना मारहाण करण्यासही सांगितले होते. परंतु सागर मोरे व किरण कोळपे यांना विळद गावातील लोकांकडून पैसे वसुली करणे अवघड झाले.
मग या दोघांनी दिपक परदेशी याचेच अपहरण करत त्याच्याकडूनच खंडणी उकळण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार त्यांनी परदेशी यांना कारमधून निंबळकच्या दिशेने नेले. परदेशीकडे दहा कोटी रुपयाची मागणी केली.
त्याने नकार देताच त्याचा गळा आवळून खून केला. मृतदेह निंबळक बायपास हायवे रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीमध्ये टाकून दिला. बडतर्फ पोलिसाने व्यापाऱ्यांचा खून केल्याने आता नगरमध्ये खळबळ उडालीय.