Ahilyanagar Zp News : गेल्या वर्षी निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेल्या बदल्यांच्या प्रक्रियेला यंदा नवसंजीवनी मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यावर्षी बदल्यांसाठी हालचाली वेगात सुरू केल्या असून, जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
बदल्यांसाठी विभागांना सूचना
जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी साधारण मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते. त्याआधी संबंधित विभागांकडून बदलीस पात्र कर्मचार्यांची माहिती संकलित केली जाते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी सर्व खातेप्रमुखांना पत्र पाठवून बदल्यांबाबत आवश्यक माहिती वेळेत गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.

विनंती बदल्यांना प्राधान्य
2023 साली झालेल्या बदल्यांमध्ये जवळपास 150 कर्मचार्यांची बदली झाली होती, आणि त्यात विनंती बदल्यांचा मोठा वाटा होता. यंदाही विधवा, परितक्त्या, कुमारीका आणि 53 वर्षांवरील महिलांना बदल्याबाबत अधिक स्वातंत्र्य देण्यात येणार आहे. त्यामुळे अशा घटकांसाठी ही प्रक्रिया अधिक दिलासादायक ठरणार आहे.
आचारसंहितेचा अडथळा
गेल्या वर्षीही बदल्यांची तयारी सुरू झाली होती, मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे संपूर्ण प्रक्रिया थांबवावी लागली होती. त्यामुळे यंदाच्या बदल्यांवरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सावट असल्याची चिंता कर्मचारी वर्गामध्ये होती. मात्र प्रशासनाकडून वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
बदल्यांचं वेळापत्रक जाहीर
प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 18 एप्रिल रोजी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिद्ध होणार आहे. 25 एप्रिलला कर्मचारी आपले विकल्प व विनंती अर्ज सादर करू शकतील आणि त्याच दिवशी हरकतीही नोंदवू शकतील. 27 एप्रिलला सर्व अर्ज एकत्रित करून खातेप्रमुखांकडे पाठवले जातील.
2 मे रोजी अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी जाहीर होईल. ही यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असून, यामध्ये चुकीची माहिती असल्यास त्याची जबाबदारी खातेप्रमुखांवर असेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. शेवटी, 31 मे रोजी रिक्त पदांच्या आधारे अंतिम बदल्या जाहीर होतील.