अहिल्यानगरकर इकडे लक्ष द्या! 1 लाख रूपये कमवण्याची संधी, फक्त द्यावी लागेल ही माहिती

Published on -

अहिल्यानगर – राज्यात गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणे कायद्याने गुन्हा असूनही, काही ठिकाणी हे प्रकार गुपचूप सुरू असल्याचे उघड झाले आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे.

सरकारने अशा अनधिकृत सोनोग्राफी केंद्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी एक विशेष योजना आणली आहे. जर कोणी अशा बेकायदेशीर प्रकारांबद्दल माहिती दिली, तर त्याला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. यासाठी टोल-फ्री क्रमांक आणि संकेतस्थळ जारी करण्यात आले असून, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यात सध्या १५२ सोनोग्राफी केंद्रे असून, त्यापैकी २७ केंद्रे विविध कारणांमुळे बंद आहेत. आरोग्य यंत्रणेकडून प्रत्येक तीन महिन्यांनी या केंद्रांची तपासणी केली जाते. नुकत्याच झालेल्या फेब्रुवारी महिन्यातील तपासणीमध्ये १५ केंद्रांची पाहणी करण्यात आली असून, कोणताही गैरप्रकार आढळलेला नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली.

जर एखाद्या गुप्त ऑपरेशनसाठी (स्टिंग ऑपरेशन) गर्भवती महिलेने मदत केली आणि अनधिकृत केंद्राचा पर्दाफाश करण्यात आला, तर तिलाही १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. या माध्यमातून केंद्रावर कारवाई केली जाते आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होतो.

गर्भलिंग निदान किंवा अवैध गर्भपात केल्यास संबंधित व्यक्तींवर कडक शिक्षेची तरतूद आहे. प्रथम गुन्हा सिद्ध झाल्यास – ३ वर्षे कारावास व १०,००० रुपयांपर्यंत दंड तर पुन्हा गुन्हा केल्यास – ५ वर्षे कारावास व ५०,००० रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे.

अवैध गर्भलिंग निदान रोखण्यासाठी सामान्य नागरिकांनीही सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कुठेही असा गैरप्रकार सुरू असल्याचा संशय आला, तर तात्काळ प्रशासनाला माहिती द्या आणि १ लाख रुपयांचे बक्षीस मिळवा!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe