अहिल्यानगरचे आधुनिक गाडगेबाबा, रामभक्त रामनवमीच्या दिवशी अनंतात विलीन !

शिरेगावचे स्वच्छतादूत राम लक्ष्मण होन यांचे रामनवमीच्या दिवशी निधन झाले. सलग तीस वर्षे गावाची स्वच्छता आणि रामनामाचा जप करणारे हे आधुनिक गाडगेबाबा होते. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Updated on -

नेवासा- तालुक्यातील शिरेगावने एक अद्वितीय व्यक्तिमत्व गमावले आहे. रावसाहेब उर्फ राम लक्ष्मण होन, वय ६०, या रामनामस्मरण करणाऱ्या स्वच्छताव्रती रामभक्ताचा रामनवमीच्या पवित्र दिवशी अनंताच्या दिशेने प्रस्थान झालं. गेली तीस वर्षे ज्यांनी गावाला आणि रामनामाला समर्पित जीवन जगलं, अशा या व्यक्तीच्या निधनाने संपूर्ण शिरेगाव हळहळून गेलं आहे.

समाजसेवेचा ध्यास

२५ वर्षांपूर्वी वडिलांच्या आणि काही महिन्यांनी आईच्या निधनानंतर राम होन यांनी संसाराचा मार्ग न पत्करता समाजसेवेचा ध्यास घेतला. आपल्या कपड्यांसह थेट शिरेगावच्या मारुती मंदिरात वास्तव्यास गेले. त्याच क्षणी त्यांनी जीवनाचा मार्ग निश्चित केला – ‘गावासाठी जगायचं, रामनामासाठी जगायचं’.

आधुनिक गाडगेबाबा

दररोज सकाळी आणि संध्याकाळी राम होन गावातील मंदिर, रस्ते, वेशी, ग्रामपंचायत, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे झाडत. एक हातात झाडू आणि ओठांवर ‘रामनाम’, हा त्यांचा दिनक्रम होता. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी ही सेवा अखंड सुरू ठेवली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना गावात ‘आधुनिक गाडगेबाबा’ असे संबोधन मिळाले.

गावासाठी सेवा

गावात दरवर्षी होणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये राम होन यांचा उत्स्फूर्त सहभाग असे. भगवा पोशाख परिधान करून कीर्तन मंडप, पाकशाळा आणि भोजन पंगतीची स्वच्छता करण्याची जबाबदारी ते स्वत:वर घेत असत. शिस्तबद्ध आणि भक्तीपूर्ण सेवा त्यांच्या कामातून सतत जाणवायची.

२५ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या रघुनाथ महाराज खटाणे यांच्या मार्गदर्शनाखालील कथा सोहळ्यात राम होन यांना ‘स्वच्छतादूत’ म्हणून सन्मानित करण्यात आले. ग्रामस्थ त्यांची चहा, पाणी व जेवणाची रोजची व्यवस्था करत, जेवढा त्यांनी गावाला आधार दिला, तेवढाच गावानेही त्यांना आपलंसं केलं.

गावात शोेककळा

रामनवमीच्या शुभ दिनी, दुपारी बारा वाजता राम होन यांनी आपला प्राण त्यागला. जणू रामनाम घेत घेतच रामाच्या सान्निध्यात प्रवेश केला. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून, अनेक ग्रामस्थ त्यांच्या आठवणी सांगताना अश्रूंना आवर घालू शकले नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe