२३ जानेवारी २०२५ नगर : अहिल्यानगर एमआयडीसी मधील पानाचे दुकान चालवणाऱ्या पंकज आकडकर या सर्वसामान्य व्यवसायिकाची मुलगी कु. श्रिशा पंकज आकडकर ही ११ वर्षीय बालकलाकार २६ जानेवारी रोजी दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या येक नंबर या चित्रपटात अभिनयाच्या माध्यमातून झळकली असून सोनी मराठी वाहिनीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत देखील कु. श्रिशा ने मालिकेच्या विविध भागांमध्ये अभिनय करून अहिल्यानगरचे राज्य पातळीवर नाव झळकावले आहे.
झी स्टुडिओच्या यक नंबर या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश म्हापुस्कर असून निर्मात्या मराठी सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडीत व वरदा नाडियादवाला आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित, पुष्कर शोत्री संजय मोने, धैर्य घोलप सायली पाटील, अजय भुरे यांच्या बरोबर कु. श्रिशा हीने अभिनयाचे काम केलेले असून या चित्रपटास अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे.
त्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर निर्मित ज्ञानेश्वर माऊली या मराठी मालिकेत देखील कु. श्रिशा हिने बाल मुक्ताईचा उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे. या मालिकेचे ५०० पेक्षा अधिक भाग पूर्ण झाले असून जगभरात ही मालिका लोकप्रिय होत आहे.
त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनामध्ये होप फाउंडेशन निर्मित ‘जिना इसी का नाम है’ या बालनाट्यात देखील श्रीशाने आपल्या अभिनयाची अविट छाप सोडली आहे.
सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या या बाल कलाकाराला वडील तसेच आई सौ. स्वप्नाली यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धा, पंडिता रमाबाई यासारखी नाटके, विविध नाट्यछटा-एकपात्री अभिनय स्पर्धा याबरोबरच नृत्य, चित्रकला आदी कलांमध्ये कु. श्रिशा लहानपणापासून पारंगत असून अनेक पारितोषिके देखील प्राप्त झालेली आहेत.
तिची लहान बहीण कु. कृष्णाली सुद्धा विविध नाटिकांमध्ये अभिनयाचे काम करत आहे. श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, प्रशालेचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, पालक विद्यार्थी तसेच सिने नाट्यरसिकांनी कु. श्रिशाचे अभिनंदन व कौतुक केले आहे.