अहिल्यानगरमधून अपघाताचे एक वृत्त हाती आले आहे. वेगात आलेल्या किया कंपनीच्या कारने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात नगर-पाथर्डी रोडवर झाला.
आधी माहिती अशी : नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात १९ मार्चला सकाळी ८.३० च्या सुमारस हा अपघात झाला आहे. या अपघातात अशोक मारुती देशमुख (वय ५३, रा, एकता कॉलनी, केडगाव) हे मयत झाले तर आसराबाई साहेबराव ठुबे (वय ७०, रा. मुंगी, ता. नगर) या जखमी झाल्या आहेत.

याबाबत मयत अशोक देशमुख यांचा मुलगा विशाल अशोक देशमुख (वय २४, रा, एकता कॉलनी, केडगाव) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किया कंपनीच्या कारचा चालक गोटीराम लक्ष्मण गारडे (रा. कात्रज, पुणे) याच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत व जखमी हे दुचाकीवर नगरहून पाथर्डीच्या दिशेने जात असताना कौडगाव शिवारात गजानन हॉटेल समोर पाथर्डीकडून भरधाव वेगात नगरकडे येणाऱ्या किया कंपनीच्या कारने (क्र. एमएच १२ टीयु ९५४९) त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली.
या धडकेत अशोक देशमुख हे जागीच ठार झाले तर आसराबाई ठुबे या जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली. त्यानंतर दुपारी विशाल देशमुख याच्या फिर्यादी वरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहेत.