संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर ग्रामपंचायतच्या महिला सरपंच मिरा रामदास भडांगे यांच्या विरुद्धचा दाखल अविश्वास ठराव सात विरुध्द दोन मतांनी मंजूर करीत त्यांना पदावरून हटविण्यात आले.
याबाबत पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार धिरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता विशेष सभा घेण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष सभेत महिला सरपंच मिरा भडांगे यांच्या विरुद्ध तीन चतुर्थांश बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
कौठे कमळेश्वर ग्रामपंचायतच्या महिला सरपंच मिरा रामदास भडांगे यांच्या कारभारावर आक्षेप घेत व सरपंच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असा ठपका ठेवत ग्रामपंचायतच्या सात सदस्यांनी शुक्रवारी (दि. २४) संगमनेरचे तहसीलदार धिरज मांजरे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल होता.
सदर अविश्वास प्रस्तावावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी तहसीलदार धिरज मांजरे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस बजावली होती.
काल गुरुवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. त्यानुसार काल गुरुवारी पार पडलेल्या विशेष सभेसाठी सरपंचासह सर्व ९ ग्रामपंचायत सदस्य हजर होते.
तहसीलदार धिरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत अविश्वासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हातवर करुन ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान घेण्यात आले.
अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच विष्णू रामनाथ पवार सदस्य नागेश मच्छिद्र यादव, वाल्हूबाई विठ्ठल वराडे, नवनाथ चांगदेव जोंधळे, सुनिता साहेबराव मुसळे, ज्योती गोरख जोंधळे व सोनाली उत्तम जोंधळे आदी ७ सदस्यांनी हातवर करून मतदान केले.
तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध सरपंच मिरा रामदास भडांगे व मोतीराम गंगाधर भडांगे या दोघांनी हातवर करून मतदान केले. दाखल अविश्वास प्रस्ताव विशेष सभेत ७ विरुद्ध २ मतांनी मंजूर करण्यात आल्याचे तहसीलदार धिरज मांजरे यांनी जाहीर केले.
सदर ग्रामपंचायतवर माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात गटाची सत्ता होती. मात्र महिला सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर केलेल्या सदस्यांनी आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेल्याचे माजी उपसरपंच नवनाथ जोंधळे यांनी सांगितले.