आगामी लोकसभा विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक पक्ष आपल्या पद्धतीने तयारीला लागले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अहमदनगर जिल्हा केंद्रस्थानी राहिला आहे. आता आगामी लोकसभेसाठी नगर दक्षिणच्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू जोर धरू लागली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. अहमदनगर दक्षिणमध्ये खा. सुजय विखे यांचे चांगले राजकीय वर्चस्व आहे. आता त्यांच्याविरोधात लोकसभेला नेवासा मतदारसंघातील ठाकरे गटाला पाठिंबा दिलेले माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांच्या नावाची चर्चा सुरू झालीये.
विखे गडाख यांच्या 1991 सालच्या राजकीय लढतीने महाराष्ट्र हलवला होता. स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्यात झालेली निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. अगदी न्यायालयीन लढत देखिलझाली होती. आता पुन्हा एकदा 2024 ला ठाकरे गटाला पाठिंबा दिलेले माजी मंत्री शंकरराव गडाख व सुजय विखे आमने सामने येण्याची शक्यता आहे. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे गडाख यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली असल्याचे समजते.

भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना आव्हान देणारा चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे बघितले जात आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा नेवासा मतदारसंघ दक्षिण लोकसभा मतदारसंघात नसला तरीही त्यांचा अहमदनगर दक्षिण मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. गडाखांकडून मतदारसंघात चाचपणी सुरू असून पक्षाने जर आदेश दिला तर विखे विरोधात गडाख ही राजकीय फाईट चांगली रंगू शकते.
गडाखांचे नाते गोते व राजकीय संबंध
नगर दक्षिणेचा विचार केला तर गडाखांचे राजळे, व घुले यांचेशी नाते आहे. त्यामुळे शेवगा व पाथर्डी मध्ये गडाखांचे सोयरे असल्याने तेथ त्यांची बाजू भक्कम होईल असे दिसते. त्याचप्रमाणे नगर दक्षिणेत जे जुने काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्याशी गडाखांचा अगदी घरोबा आहे. त्यामुळे हे राजकीय संबंध तसेच श्रीगोंदेत साजन पाचपुते यांना शिवसेनेने ( ठाकरे गट ) उपनेतेपद दिले आहे. त्यामुळे तेथेही त्यांना चांगले बळ मिळेल. पारनेर मध्ये माजी आमदार विजय औटी हे कट्टर शिवसैनिक. तेथे गडाखांना फायदा होईल. कर्जत जामखेड मध्ये रोहित पवारांचे राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे तेथेही गडाख यांना पाठबळ मिळेल.
उद्धव ठाकरे यांची खेळी व शरद पवार यांचे संबंध
गडाख यांचे नाव मागील काही दिवसांपासून लोकसभेसाठी चर्चेत होते. बहुतेक याचमुळे आगामी काळात शिवसेनेला पाठबळ लागेल या हिशोबाने साजन पाचपुते याना उपनेते पद दिले असावे अशी चर्चा आहे. तसेच गडाख यांचे शरद पवार यांच्याशी असणारे जवळीकतेचे संबंध सर्वश्रुत आहेत. आणि दक्षिणेत मोठ्या साहेबांची चांगलीच राजकीय पकड आहे. त्यामुळे आता त्याचाही फायदा गडाख यांना होईल असे दिसते.
उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही
मागील विधानसभेत अपक्ष निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधलं. मध्यंतरी शिवसेनेत फूट पडल्यानंतर गडाख मात्र एकनिष्ठ राहिले. उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही असा विश्वास त्यांनी दाखवला. त्याची एक सहानुभूती देखील त्यांच्या मागे आहे.
खा. सुजय विखेंसाठी आव्हान
त्यामुळे आता नगर दक्षिण लोकसभेची जागा ठाकरे गटाला दिली व शंकरराव गडाख याना उमेदवारी मिळाली तर निश्चितच सुजय विखेंसाठी आव्हानात्मक निवडणूक असेल. परंतु यात सुजय विखे यांचे राजकीय संबंध, मतदारांशी थेट कनेक्शन. कामाची योग्य पद्धत या गोष्टी विखे यांना फायदेशीर ठरतील. त्यामुळे आता सुजय विखे-शंकरराव गडाख यांच्यात काटे की टक्कर होणार का? राज्याला 1991 ची पुनरावृत्ती पहायला भेटणार का? पवार-ठाकरेंची नवी खेळी इतिहास घडवणार का? याची उत्तरे लवकरच सर्वांसमोर असतील.