अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नगर-सोलापूर महामार्गावरील साकत (ता. नगर) शिवारात पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लुटमार करणार्या आजिनाथ भोसले टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.(Ahmednagar Crime)
कुख्यात गुन्हेगार आजिनाथ भोसलेसह सहा आरोपींचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा पोलिसांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला त्यांनी गुरूवार, 30 डिसेंबर 2021 रोजी मान्यता दिली आहे.
मोक्का कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईत कृष्णा विलास भोसले (वय 22), रावसाहेब विलास भोसले (वय 40), आजिनाथ विलास भोसले (वय 25), भरत विलास भोसले (सर्व रा. हातवळण दाखले ता. आष्टी जि. बीड), सुरेश पुंजाराम काळे (वय 38 रा. सोनविहीर ता. शेवगाव), पवन युनुस काळे (रा. गुनवडी ता. नगर) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी कृष्णा भोसले, रावसाहेब भोसले, आजिनाथ भोसले, सुरेश काळे यांना अटक केली आहे. तर भरत भोसले व पवन काळे हे दोघे पसार आहेत. दरम्यान अजिनाथ भोसले याच्या टोळीमध्ये सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत.
अजिनाथ भोसले या टोळीचा प्रमुख आहे. गुन्ह्या करण्याचे नियोजन तो करत होता. त्याचे साथीदार त्यांना सोपविलेली जबाबदारी पार पडत होते. रावसाहेब आणि भरत या दोन भावांची त्याला साथ मिळत होती.
1 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे नगर-सोलापूर महामार्गावरील साकत शिवारातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लुटमार केल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोडा, आर्म अॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासादरम्यान सदरचा गुन्हा भोसले टोळीने केल्याचे सिध्द झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यातील चौघांना अटक केली होती. नगर तालुका पोलिसांनी भोसले टोळींविरोधातील गुन्ह्यांची कुंडली काढून मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला.
सदरचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या परवानगीने 20 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिक येथे पाठविला. या प्रस्तावाला गुरूवारी मंजूरी मिळाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम