Ahmednagar BJP Politics News : 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. यानंतर भाजपाने या गृहप्रवेशाची भेट म्हणून त्यांना नगर दक्षिणची उमेदवारी दिली. निवडणुकांच्या वेळी मात्र त्यांचे वडील महाराष्ट्र राज्याचे वर्तमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या गोट्यात होते.
मात्र त्यावेळी त्यांनी आपल्या पुत्राला विजयी बनवण्यासाठी काँग्रेसमध्ये राहून देखील अपार कष्ट घेतले होते. दरम्यान 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे यांनी विजयाची पताका फडकवली.
यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील काँग्रेसला सोडचिट्टी दिली आणि भाजपा मध्ये प्रवेश केला. पण, तेव्हापासून अहमदनगर भाजपा मध्ये शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. विखे यांचे विरोधी आजही त्यांना पक्षात राहून टार्गेट करत आहेत.
दरम्यान, काल अर्थातच एक मार्च 2024 ला भाजपचे विवेक कोल्हे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला आहे.
यावेळी विवेक कोल्हे यांनी विखे पाटील यांच्यावर काही आरोप देखील केले आहेत. विवेक कोल्हे यांची सत्ता असलेल्या कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना विखे पाटील हे निधी देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
शासकीय निधी वाटपावरून भाजपामध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. कोल्हे आणि विखे यांचा राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून राजकीय दृष्टिकोन ठेवून निधी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप यावेळी केला आहे.
निधी देण्यात दुजाभाव होत असल्याने कोल्हे यांनी हा भव्य मोर्चा काढला होता. दरम्यान, यावेळी कोल्हे यांनी विखे पाटील यांना थेट ईशाराचा दिला आहे. कोल्हे म्हटलेत की, ‘कोपरगाव आणि राहाता तालुक्यात असलेले अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची शेवटची संधी तुम्हाला देत आहे.
जर तुमच्यात सुधारणा झाली नाही तर तर जनतेच्या हितासाठी विखे पाटलांच्या विरोधात राहाता मतदार संघात तळ ठोकणार आहे.’ खरे तर विखे पाटील आणि कोल्हे यांच्यातला राजकीय वाद हा काही नवा नाही.
या वादाची ठिणगी तेव्हा पडली होती जेव्हा 2019 मध्ये भाजपाच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघात बीजेपीकडून स्नेहलता कोल्हे या उभ्या होत्या.
मात्र या निवडणुकीत स्नेहलता यांचा पराभव झाला. त्यावेळी हा पराभव विखे पाटील यांनीच घडवून आणला आहे असा आरोप विवेक कोल्हे यांनी केला होता आणि याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे केली होती. तेव्हापासून कोल्हे आणि विखे पाटील यांच्यात एकाच पक्षात असल्यावर सुद्धा शीतयुद्ध सुरू आहे.