पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सात ठिकाणी चोरी करून शेतकऱ्यांच्या दारासमोरील शेळ्या व मोटारसायकल घेऊन पोबारा केला. गावात एकाचवेळी सात ठिकाणी चोऱ्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, चोरटयांनी रविवारी मध्यरात्री संतोष लक्ष्मण वामन यांच्या घरासमोर लावलेली मोटारसायकल व सुखदेव बबन शिंदे, बाबासाहेब परसराम शिंदे व बाप्पू बबनराव शिंदे यांच्या घरासमोरील प्रत्येकी एक शेळी चोरून नेली तर महादेव निवृत्ती कराळे यांचे टेलरिंगचे दुकान फोडून शिवलेले नवीन कपडे व कापड चोरीला गेले आहे तसेच विनायक यमाजी शिंदे यांचा किराणामाल चोरीला गेला आहे.
चोरीचा हा प्रकार पहाटेच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात आला. सकाळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सौरभ राजगुरू यांच्यासह श्वानपथक व ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते.
चोरीच्या घटनेनंतर पोपट छगन शिंदे यांच्या शेतामध्ये आढळून आलेली एक बेवारस मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडण्याचादेखील चोरट्यांनी प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या चोऱ्यांचा पोलीसांनी तपास करावा, अशा सूचना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. चोरीचा तत्काळ तपास करावा, अशी मागणी सचिन शिंदे, रंगनाथ आंधळे, अजिंक्य शिंदे, सागर कराळे, मिनीनाथ शिंदे भागवत शिंदे, देविदास शिंदे यांनी केली आहे.