AhmednagarLive24 : सहकारी संस्था आणि राजकीय प्रभाव असलेल्या नगर जिल्हयाच्या उत्तर भागात मोठ्या शैक्षणिक संस्थांचेही जाळे आहे. बहुतांश राजकीय नेत्यांच्या या संस्था असून केवळ नगरच नव्हे तर बाहेरचे विद्यार्थीही येथे मोठे शैक्षणिक शुल्क मोजून प्रवेश घेतात.
या शिक्षण संस्थांच्या मक्तेदारीला आता आव्हान मिळण्याची शक्यता आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध प्रकारचे उच्च शिक्षण देणारी महाविदयालये सुरू करण्यात येणार आहे. संस्थानचे अद्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनीच एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे.
परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शैक्षणिक संस्था सुरू करण्यात येणार असून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी अध्यक्ष आमदार काळे यांनी दिली.
‘संस्थानतर्फे एमबीबीएस, बी.एस्सी., नर्सिंग, विधीशाखा, अध्यापन शास्त्र याप्रकारचे शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे’, असे काळे यांनी सांगितले.
शिर्डी संस्थानला अशी शिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास या भागातील कोपरगाव, प्रवरानगर, संगमनेर येथील सध्या सुरू असलेल्या विविध नेत्यांच्या शिक्षण संस्थांसाठी मोठा स्पर्धक निर्माण होण्याची शक्यता आहे.
संस्थानचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून आमदार काळे यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. शिर्डी संस्थानमार्फत शैक्षणिक संस्था सुरू केल्यास याचा फटका काळे यांच्या विरोधी नेत्यांच्या संस्थांना अधिक बसण्याची शक्यता आहे.