अहमदनगर ब्रेकींग: घर खाली करण्यासाठी कुटूंबाला मारहाण करणार्‍या भाजपा नगरसेवकासह सहा जणांविरूध्द गुन्हा

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- घर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून सावेडीतील एका कुटूंबाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यामध्ये नगरसेवक स्वप्नील शिंदे, आभि बुलाखे व इतर चार ते पाच जणांचा समावेश आहे. राजु कारभारी गोंडगीरे (वय 48 रा. रेणुकानगर, औरंगाबाद रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

राजु गोंडगीरे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. ते सावेडी उपनगरातील बोरा यांच्या मालकीच्या जागेत मागील 50 वर्षांपासून राहत आहेत. 11 मार्च, 2022 रोजी रात्री शिंदे, बुलाखे व इतरांनी गोंडगीरे यांच्या घरामध्ये प्रवेश करून घर खाली करण्यासाठी गोंडगीरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

शिवीगाळ करत घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच घर खाली करण्याच्या कारणासाठी 11 मार्च, 2022 रोजी साडेआठच्या सुमारास शिंदे व इतरांनी गोंडगीरे यांना शिंदे यांच्या कार्यालयात बोलवून डांबून ठेवत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शिंदे व इतरांनी यापूर्वी देखील फोन करून व घराचे नुकसान करून मला घर खाली करण्यासाठी त्रास दिला होता. तशी तक्रार तोफखाना पोलिसांकडे करण्यात आली होती, असेही गोंडगीरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe