अहमदनगर ब्रेकिंग : नगर शहरातील सराईत गुन्हेगाराची टोळी दोन वर्षासाठी हद्दपार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला नगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तोफखाना पोलीस ठाण्याने पाठवलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अंतिमतः मंजुरी दिली आहे.

टोळी प्रमुख कुणाल ऊर्फ सनी अनिल कांबळे (वय २४), टोळी सदस्य गौरव राजेंद्र गायकवाड (वय २१), अमोल हिरामण गायकवाड (वय २०), स्वप्नील सुनील पारधी (वय २३), अभिषेक ऊर्फ घाऱ्या दिलीप लोणारे (वय २० सर्व रा. निलक्रांती चौक, नगर) असे हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.

गैर कायद्याची मंडळी जमून दंगा करणे, घातक शस्त्र बाळगणे, विनयभंग, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न, दरोडा अशा गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे या टोळीने केले आहेत.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर या टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करावे असा प्रस्ताव तोफखाना पोलीस ठाण्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता.

या प्रस्तावाला अधीक्षक पाटील यांनी मंजुरी दिली आहे. तोफखाना पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना शिरूर (जि. पुणे) या ठिकाणी सोडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक पोलीस निरीक्षक मुजावर, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस अंमलदार खंडागळे, गिरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe