अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- पाच ते सहा दिवसांपासून घरीच उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची घटना नगरमध्ये घडली. विजय महादेव राठोड (वय 46 रा. बुर्हाणनगर ता. नगर, मुळ रा. वांगुज ता. आष्टी जि. बीड) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे.
राठोड हे कल्याण आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूस महामंडळ आणि शासन जबाबदार असल्याचा रोख मुलाने केला आहे. ते एसटीच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होते.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सध्या राज्यभर संप सुरू आहे. राठोडही या संपात सहभागी झाले होते.
त्यांनी नगर शहरातील तारकपूर येथील संपात सहभाग घेतला होता. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ते उपाशी होते. रविवारी ते नगर जवळील मिरावली पहाड
येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
आर्थिक विवचनेत असलेल्या वडिलांची व्यथा…
याप्रकरणी विजय राठोड यांचा मुलाने सांगितले कि, वडिलांचा पगार सात हजार रूपये इतका झाला होता. दिवाळीचा बोनस ही अडीच हजार रूपये मिळाला होता.
लॉकडाऊन काळात चार महिने केलेल्या कामाचा मोबदलाही त्यांना मिळाला नाही. सात हजार रूपयात घर खर्च कसा चालणार या चिंतेत ते होते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांनी जेवणही घेतले नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाने केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम