Ahmednagar Breaking : अहमदनगर लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या प्रचार काळात पारनेर तालुका नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. दरम्यान आता एक अत्यंत महत्वाची बातमी आली असून पारनेर पुन्हा चर्चेत आले आहे.
याचे कारण म्हणजे पारनेरमध्ये एमआयडीसीतील कॉट्रॅक्टवरुन दोन गटांत तुफान राडा झाला आहे. वाहतुकीच्या कॉट्रॅक्टवरून नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दोन गटांमध्ये हा तुफान राडा झाला असल्याची माहिती मिळाली आहे. हाणामारी तसेच दगडफेक देखील यावेळी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
परीसरातील काही तरूणांकडे मागील चार वर्षांपासून एमआयडीसीमधील एका कंपनीच्या ट्रान्सपोर्टचे कॉक्ट्रॅक्ट आहे. या तरूणांनी या कॉक्ट्रॅक्टवरचा हक्क सोडावा यासाठी सुरू असलेल्या चर्चेतून वादाची ठिगणी पडली आणि त्याचे रूपांतर धुमश्चक्रीमध्ये झाले.
एमआयडीसील लगतच्या नगर-पुणे महामार्गावर दोन्ही गट एकमेकांना भिडले. हाणामारी तसेच दगडफेक सुरू झाल्याने जवळपास तासभर या भागात तणावाचे वातावरण होते.
पारनेर तालुक्यासह तालुक्याबाहेरील काही तरूणही या धुमश्चक्रीत सहभागी झाले होते. या घटनेची माहीती समजल्यानंतर सुपा पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हस्तक्षेप करत हा प्रकार शांत केला.
विविध कंपन्यांचे कॉक्ट्रॅक्ट घेण्यावरून या भागात तरूणांच्या गटामध्ये नेहमीच वाद होतात. गुंड प्रवृत्तीच्या तरूणांना पुढे करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा काही तरूण प्रयत्न करतात. दुसऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट आपणाकडे घेण्यासाठी सुरू असलेला बळाचा वापर एमआयडीसीमधील उद्योजकांसाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरलेला आहे.
बऱ्याचवेळेला या असल्या प्रकरणांमध्ये राजकीय ‘वास’ असल्याची चर्चा होत असते. राजकीय सपोर्ट या गुंडांना असतो का त देखील पोलिसांनी तपासले पाहिजे अशी चर्चा नागरिक करत आहेत.