अहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायत सदस्याची मुजोरी; ग्रामसेवकाला घेतले कोंडून

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगर तालुक्यातील खोसपुरी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक काम करत असताना तेथील ग्रामपंचायत सदस्याने त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. कामाच्या फाईली फाडून ग्रामसेवकास ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले.

याप्रकरणी ग्रामसेवक राहुल नामदेव गांगर्डे (वय 34 रा. इमामपूर ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सदस्यासह पाच जणांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदस्य आसाराम लक्ष्मण वाघमोडे (रा. खोसपुरी) व त्याच्या सोबतचे अनोळखी चार व्यक्तींविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. गांगर्डे हे गेल्या 10 वर्षांपासून इमामपूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणून काम करतात.

त्यांच्याकडे खोसपुरी व धनगरवाडीचा अतिरिक्त पदभार आहे. मंगळवार, 15 मार्च 2022 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामसेवक गांगर्डे ग्रामपंचायतमध्ये वसुली, दाखले व उतारे याचे काम करत होते.

त्यावेळी ग्रामपंचायत शिपाई संजय नामदेव गायकवाड, राहुल जगन्नाथ चव्हाण हे देखील तेथे होते. त्यावेळी तेथे गावातील अदिनाथ गोरक्षनाथ नागरगोजे तसेच जगन्नाथ खंडु पिसाळे हे घरकुल मंजुरीचे कागदपत्रे देण्यासाठी आले होते.

त्यावेळी सदस्य वाघमोडे कार्यालयात आले व गांगर्डे यांना म्हणाले, ‘ तु माझा फोन का उचलत नाही, तु ग्रामपंचायत कार्यालयात काय चाललेय याची माहिती मला का देत नाही,

तुला येथे काम करायचे आहे का, करायचे असेल तर आम्ही सांगतो तसे कर नाही तर तुला अत्ताचे अत्ता येथून उडवून टाकतो’, असे म्हणत सरकारी रजिस्टर व फाईलमधील पाने फाडून फेकून दिले.

त्यानंतर वाघमोडे याने त्याच्या सोबतच्या चौघांच्या मदतीने ग्रामसेवक गांगर्डे यांच्यासह संजय गायकवाड, अदिनाथ नागरगोजे तसेच जगन्नाथ पिसाळ यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले.

अर्धा तासाने वाघमोडे व त्याचे सहकारी पुन्हा तेथे आले. त्यांनी गांगर्डे यांना शिवीगाळ करत धमकी दिली व निघून गेले. या गुन्ह्याचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe