अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- चौघांनी दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. याच प्रमाणपत्राच्या आधारे एसटी बसमध्ये प्रवास भाड्याचे ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला होता.
त्यांची ही बनावटगिरी उघड झाली आहे. समाज कल्याणचे सहायक सल्लागार दिनकर भाऊराव नाठे (वय 42 रा. अंबिकानगर केडगाव) यांनी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विक्रम विष्णुकांत राठी (रा. कोपरगाव), सुनिल खंडु पवार (रा. सुरेगाव ता. कोपरगाव), विश्वनाथ ग्यानदेव फाळके (रा. निंबोडी ता. कर्जत), महेश दशरथ मते (रा. सावेडी, अहमदनगर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सहायक सल्लागार नाठे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडील 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या कागदपत्रांची पडताळणी करून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास भाड्यात सवलत मिळणेबाबत ओळखपत्र देण्याचे काम आहे. 2 मे 2018 रोजी चौघांनी त्यांचेकडे ओळखपत्र मिळणेबाबत अर्ज केला होता.
त्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडील 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर केले. प्रमाणपत्रावरील सही व हस्ताक्षर यामध्ये नाठे यांना तफावत दिसुन आली.
त्यांना सदरची प्रमाणपत्र बनावट असल्याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी ते प्रमाणपत्र ठेवुन घेवुन त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालयास पत्रव्यवहार करुन ते प्रमाणपत्र दिले अगर कसे याबाबत माहिती विचारली होती.
ते प्रमाणपत्र दिलेबाबत नोंद नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाकडून नाठे यांना कळविण्यात आले. त्यानंतर सदरचे प्रकरण सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांचे कार्यालयात पाठविले.
सदर कार्यालयाकडुन समाज कल्याण विभाग यांना संबंधीतावर फौजदारी कारवाई करणेबाबत आदेश झाले आहेत. त्यानुसार नाठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार हे करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम