AhmednagarLive24 : दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली असून कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री केली जाते याबद्दल भाष्य करण्यात आले आहे.
दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी तब्बल सव्वा तीन कोटींचे सहा ते सात टन रक्तचंदन जप्त केले आहे. एमआयडीसी हद्दीत शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ते एका गोडाऊन मध्ये साठवून ठेवले होते.
एमआयडीसी हद्दीत सदाशिव झावरे यांच्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवलेले आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना मिळाली होती.
त्यांनी पथकासह नमुद ठिकाणी दोन पंचासह छापा टाकुन खात्री केली असता, गोडाऊनमध्ये बटाट्याच्या गोण्याखाली लपवून ठेवलेले सहा ते सात टन रक्तचंदन मिळून आले आहे.
त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे तीन कोटी 25 लाख रुपये किंमत आहे. पोलिसांनी सर्व रक्तचंदन जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.