अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपीला विशेष जिल्हा न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि नऊ हजार रूपयांच्या दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली.
प्रमोद मच्छिंद्र कदम (वय 41 रा. सुपा ता. पारनेर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव ओह. या खटल्यात विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकिगत अशी की, आठ वर्षीय मुलगी 13 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी शाळेतील पटांगणात खेळत होती.
त्यावेळेस आरोपी प्रमोद कदम हा शाळेच्या प्रवेशद्वारावर आला. पीडित मुलीला बाहेर बोलाविले. परंतु, मुलीने बाहेर येण्यास नकार दिला. त्यावर प्रमोद याने ‘चल तुला तुझ्या पप्पांनी बोलाविले आहे.’ असे म्हणून पीडित मुलगीस एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला.
तिच्या शरीराला वाईट हेतूने स्पर्श करू लागला. त्यामुळे पीडित मुलगी घाबरून मोठ्याने रडू लागली. सदर घटना ही रस्त्यावरून जाणार्या एका महिलने पाहिली.
तिने विद्यालयातील मुलांना मदतीसाठी बोलवून अल्पवयीन मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. मुलीने शाळेच्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापिका यांना हा प्रकार सांगितला.
मुख्याध्यापिका यांनी पीडित मुलीसह सुपा पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द फिर्याद दिली. सुपा पोलिसांनी अपहरण करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2013 (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत खोसे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले.
पीडित मुलगी, शाळेच्या मुख्याध्यापिका तथा फिर्यादी, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुरावा तसेच विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी महिला पोलीस नंदा गोडे यांनी कामकाज पाहिले.