जलजीवन ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना केंद्राने राबवली. परंतु या कामाबाबत प्रचंड आरोप, भ्रष्टहरेचे आरोप सातत्याने होत आलेत. आता मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या मात्र, अद्याप पूर्ण न होऊ शकलेल्या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या जलजीवन योजनेतील कामाची तपासणी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाकडून करण्यात आली. यात राहुरी, राहाता, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील योजनेतील कामाचा समावेश असून या तपासणीत काय त्रुटी अथवा चुका आढळल्या याबाबतचा अहवाल तपासणी पथक जलशक्ती मंत्रालयाकडे सादर करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून जलजीवन योजनेच्या कामांना मंजुरी मिळाली असून आजही ती प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अनेक तालुक्यात जलजीवनच्या कामाबाबत तक्रारी असून यापूर्वी याबाबत राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाकडे या कामांबाबत तक्रारी झालेले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक कुटूंबाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सरकार पातळीवरून महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून जलजीवन योजना राबवण्यात येत आहे. मात्र, अनेक प्रयत्न करूनही या योजनेतील कामे यांचा दर्जा आणि ती पूर्ण होत नसल्याने योजनेबाबत तक्रारी वाढतांना दिसत आहे.

आता तर जलजीवनबाबत थेट केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडे तक्रार झाल्यानंतर आठ दिवसापूर्वी केंद्र सरकारचे पथक जिल्ह्यात आले होते. या पथकांनी श्रीगोंदा, पारनेर, राहाता आणि राहुरी या तालुक्यात जावून प्रत्यक्षात योजनेच्या कामाची तपासणी केली आहे. तपासणीत पथकाला काय आढळले याचा तपशील मिळाला नसला तरी हे पथक आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषदेत या तपासणीबाबत गोपनियता पाळण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.