अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. दरम्यान आता राजकीय वाद धार्मिकतेकडे झुकतोय की काय असे चित्र सध्या निर्माण झालेय. त्यात आता ‘मौलाना’ शब्दावरून नगरचा राजकीय आखाडा तापण्याची शक्यता निर्माण झालीये. नुकतेच कापड बाजारातील एका मारहाणीच्या प्रकरणानंतर आ. संग्राम जगताप यांनी कापड बाजारात धाव घेत चांगलाच समाचार घेतला होता.
त्यात त्यांनी, नगर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांचा पारनेरचा मौलाना असा उल्लेख नगरचे महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी येथे केला. आता यात त्यांनी लंके यांचे नाव घेतले नव्हते तरी देखील ते लंके यांनाच उद्देशून म्हटले असं नागरिक बोलतात. नगरच्या कापड बाजारातील अतिक्रमणांना पाठीशी घालण्याचे काम खा. लंकेंकडून होत असल्याचा दावा त्यांचे नाव न घेता आ. जगतापांनी केला व त्यांना सडेतोड उत्तर देण्याचा इशाराही दिला. दरम्यान, आ. जगतापांनी खा. लंकेंवर नाव न घेता केलेल्या या टीकेला राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाने काहीही उत्तर दिलेले नाही.

पण शहरातील ठाकरे सेनेचे नवे शहर प्रमुख किरण काळे यांनी मात्र आ. जगतापांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख भवानीनगरचे मौलाना असा केला आहे. या पार्श्वभूमीवर आता नगरमध्ये मौलाना शब्दावरून राजकीय वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी दिनांक २९ मार्च रोजी १० ते १५ गुंडांकडून मारहाण करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की कापड बाजार येथे पोलिस चौकी उभी करावी, जेणे करून गुंडांवर आळा बसेल, महिलांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.
पारनेरवरून तो मौलाना येत असून पाठीशी घालण्याचे काम करत आहे. त्यांना देखील सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा आमदार जगताप यांनी दिला. तर त्यानंतर आता ठाकरे सेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी म्हटले आहे की,शहरामध्ये हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला अजमत उर्फ अजू खान आणि त्याची टोळी दिवसाढवळ्या छेडछाड काढत भर बाजारपेठेत मारहाण करते. या खान टोळीवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळा. अज्जू खान हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचा आरोप करत किरण काळे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर असणारे त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केले आहेत.
प्रसार माध्यमांनाही उपलब्ध करून दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुकुंदनगर भागात विद्यमान लोकप्रतिनिधींची प्रचार यंत्रणा याच खानच्या घरातून राबवली जात होती. रेहमानी किड्यांना वळवळ करण्यासाठी बेगडी हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेले सुलतानी किडेच पाठबळ देत आहेत. भवानीनगरचा मौलवीच खान टोळीचा गॉडफादर असल्याचा आरोप यावेळी किरण काळे यांनी केला. त्यामुळे आता शहरातील वातावरण ‘मौलाना’ शब्दामुळे चांगलेच गरम होण्याची चिन्हे आहेत.