Ahilyangar Breaking : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक संत शेख महंमद बाबा देवस्थानचा श्रीगोंदेकरांच्या मनात आहे तसाच विकास होणार आहे. मागील काही दिवसांपासून वक्फ बाबत जी भिती पसरवण्यात आली होती ती वक्फची नोंदणी रद्द करण्यासाठी संत शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी काल (दि.२२) जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. यावेळी ते बोलत होते.
आमीन शेख म्हणाले, काहींनी श्रीगोंद्यात वक्फ बाबत भितीचे वातावरण तयार करुन आम्हाला व्हिलन करण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर विविध प्रकारचे खोटे आरोप करण्यात आले. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेल्या सुचने नुसार वक्फची नोंदणी रद्द करण्याकामी प्रस्ताव दाखल करण्यात आला असून दि.१६ च्या आ.पाचपुते यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे शेख महंमद बाबा यांच्या देवस्थानचा विकास करण्यात येणार आहे.

शेख महंमद बाबांच्या भाविक भक्तांच्या भावनेचा आदर करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी सारखे मोठे तिर्थक्षेत्र होण्यासाठी सर्व श्रीगोंदा वासियांनी सहकार्य करावे असे आवाहन आमीन शेख यांनी केले आहे.दरम्यान, लोकांना आमच्या विरुद्ध भडकावून देण्यासाठी असे सांगण्यात आले की, आम्ही तेली गल्ली, शनिचौक, बगाडे कॉर्नर येथील लोकांच्या जागेवर वक्फ बोर्डाचे नाव लावले. ते साफ खोटे आहे.अशी प्रतिक्रिया आमीन शेख यांनी दिली.
वक्फ सुधारणा कायद्यानंतर भारतात सर्वात प्रथम जमीन माघारी घेणे व नोंदणी रद्द करणे यासाठी अमीन शेख यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार व सहर्ष स्वागत. लवकरच ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने भव्य दिव्य श्री संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला दिसेल असे टिळक भोस यांनी म्हटलंय.