Ahilyangar Breaking : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक संत शेख महंमद बाबा देवस्थानचा श्रीगोंदेकरांच्या मनात आहे तसाच विकास होणार आहे. मागील काही दिवसांपासून वक्फ बाबत जी भिती पसरवण्यात आली होती ती वक्फची नोंदणी रद्द करण्यासाठी संत शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी आज (दि.२२) जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला.
यावेळी ते बोलत होते. आमीन शेख म्हणाले, काहींनी श्रीगोंद्यात वक्फ बाबत भितीचे वातावरण तयार करुन आम्हाला व्हिलन करण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर विविध प्रकारचे खोटे आरोप करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, देवस्थानची वक्फबोर्डाकडे का नोंदणी केली याबाबत देखील शेख यांनी माहिती दिली.

वक्फ बोर्ड कडे का जावे लागले ?
२००८ साली आमच्या कुटुंबाच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करुन आमच्या राहत्या घरातील सामान यात्रा समितीने बाहेर फेकून दिले, आमचे लहान मुले, महिलांना घरातून हुसकावून लावून जिर्णोधाराच्या नावाखाली देवस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
यात्रासमितीच्या हातून देवस्थान वाचवण्यासाठी आम्ही वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली. त्या नोंदणीमुळे देवस्थानच्या जागेवर कुणालाही मालकी सांगता येत नाही त्या साठी आम्हाला तिकडे नोंदणी करावी लागली.
वक्फ कडे आम्ही नोंदणी केली असल्याचे त्या वेळेसच यात्रासमितीला माहिती होती. जेथे शेख महंमद बाबा यांचे देवस्थान आहे ती सुमारे १० एकर आणि लेंडी नाला, मिशन बंगला पाठीमागे असलेली शेख महंमद बाबा यांची इनामी जागा आहे असे तिन्ही मिळून ३९ एकर जागा आहे अशी माहिती शेख यांनी दिली.