अहमदनगर : जमीन व्यवहारात फसवणूक, प्रतिबंधित जमीन खरेदी करून आदिवासी महिलेला केले भूमिहीन, अधिकारी, बिल्डरवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर तालुक्यातून आदिवासी महिलेची जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याची एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील निंबळक येथील एका आदिवासी महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत खरेदीस प्रतिबंध असलेल्या इनामी जमिनीची खरेदी करून सदर आदिवासी महिलेला भूमिहीन बनवले गेले आहे. विशेष म्हणजे या फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये काही अधिकार्‍यांचा देखील समावेश आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अहमदनगर तालुक्यातील निंबळक येथील सिंधूबाई मुरलीधर निकम या 70 वर्ष वय असलेल्या आदिवासी महिलेबाबत ही घटना घडली आहे. सिंधुबाई यांनी या प्रकरणात पोलिसांमध्ये धाव घेतली होती. पण, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दाखवला यामुळे या महिलेने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, माननीय न्यायालयाने या प्रकरणात तेरा जणांविरूद्ध कट रचणे, बनावट कागदपत्रे तयार करणे यासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून यानुसार शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्यासह महसूल आणि निबंधक कार्यालातील अधिकाऱ्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निकम यांच्या इनामी जमिनीची ऑक्टोबर २०१० ते एप्रिल २०२४ या काळात विविध खरेदी खतांद्वारे परस्पर खरेदी, विक्री, फेरखरेदी करण्यात आले असल्याचे या महिलेने म्हटले आहे. दरम्यान जमिनीच्या या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याची तक्रार निकम यांनी पोलिसांत केली होती.

मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. एडवोकेट सागर पादर यांच्यामार्फत निकम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. यात न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिनेश भगवानदार छाबरिया, सरला भगवानदास छाबरिया, शिवाजीराव आनंदराव फाळके, आशीष रमेश पोखरणा, जयवंत शिवाजीराव फाळके, आकाश राजकुमार गुरनानी, माणिक आनंदराव पलांडे, अजय रमेश पोखरणा, गौतम विजय बोरा, नरेंद्र शांतिकुमार फिरोदिया, तलाठी हरिश्चंद्र देशपांडे, मंडल अधिकारी दिलीप जायभाय आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन संबंधित अधिकारी यांच्याविरूद्ध ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता या प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe