शेवगावात शेअर मार्केटच्या नावाखाली मोठा घोटाळा; एसआयटी चौकशी ठरतोय कळीचा मुद्दा? तब्बल ३८ गुन्हे दाखल तर २८ आहेत अटकेत

Published on -

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, शेवगाव पोलीस ठाण्यात जून २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात अद्याप १८ गुन्ह्यांमध्ये एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही, तर २० गुन्ह्यांमधील २८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र, सहा गुन्ह्यांची चौकशी अद्याप प्रलंबीत आहे.

युवा सेनेचे माऊली धनवडे यांनी माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक माहिती उघड केली आहे.या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेवगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. तालुक्यात विवीध ठिकाणी उपोषणे, रास्ता रोको, मोर्चे आयोजीत करण्यात आले असून, प्रमुख मागणी एसआयटी (विशेष तपास पथक) नेमण्याची करण्यात येत आहे. यापूर्वी आमदार मोनिकाताई राजळे यांनीही जुलै २०२४ मध्ये पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना सभागृहामध्ये मांडून तारांकीत प्रश्नाद्वारे एसआयटी चौकशीची मागणी केली होती.

यावर गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी देखील केली असली, तरी अद्याप एसआयटी चौकशी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेवगावच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी अनेकांना अटक केल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती अधिकच वाढताना दिसत आहे. पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होत असून, गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

शेवगावसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या घोटाळ्याचा मोठा फटका बसला असून, नागरिक आपल्या गुंतवणुकीसाठी न्यायाची वाट पाहत आहेत. आता प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून तातडीने एसआयटी चौकशी सुरू करावी, अशी मागणी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe