देहरे येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारा देहरे ग्रामस्थांचे खा. नीलेश लंके यांना साकडे

Published on -
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने जिल्हयात हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी संसदेत मागणी केल्यानंतर या महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे.
नगर शहरापासून जवळ असलेल्या देहरे येथे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची  मागणी तेथील ग्रामस्थांनी खा. नीलेश लंके यांच्याकडे केली आहे. नगर तालुक्यातील देहरे येथे राज्य शासनाच्या मालकीच्या८.७४ हेक्टर जागेचा विचार करावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे नगर तालुका उपाध्यक्ष महेश कांबळे व सुरज धनवटे यांनी नवी दिल्ली येथे खा. नीलेश लंके यांची भेट घेऊन सादर केले.
खा. लंके यांनी संसदेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी लाऊन धरल्यानंतर आता या महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याने विविध ठिकाणी हे महाविद्यालय उभारावे अशी मागणी होऊ लागली आहे. परंतू देहरे हे नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे.जिल्हयातील मध्यवर्ती ठिकाणी असून नगर-मनमाड महामार्गावर आहे.
महाराष्ट्र शासनाची जागाही महामार्गालगत असल्याने या जागेसाठी खा. लंके यांनी समितीकडे शिफारस करावी अशी आग्रही मागणी देहरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.  पंचायत समितीचे मा. सदस्य व्हि.डी.काळे, अरूण लांडगे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे देहरे येथील अध्यक्ष डॉ. अनिल लांडगे व सर्व सदस्य, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुनील बालवे यांच्यासह देहरे ग्रामस्थ या महाविद्यालयासाठी आग्रही आहेत.

देहरे व परिसराचा विकास होईल 

देहेरे येथील ८.७४ हेक्टर क्षेत्र हे शैक्षणिक संस्थांसाठी वाटप करण्यात आले असून या जागेचा विचार झाल्यास देहरे व परिसरातील विळद, पिंपरी, शिंगवे, नांदगांव या गावांचा विकास अधिक जोमाने होण्यास हातभार लागेल. शिवाय नगर एमआयडीसी तसेच नव्याने मंजुर एमआयडीसी देहरे गावापासून जवळ असल्याचे देहरे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe