Ahmednagar City News : ‘अमृत’मुळे शहराचा पाणी प्रश्न सुटला – आ. जगताप

Published on -

Ahmednagar City News : मुळा धरण येथून १९७२ साली नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली योजना झाली आहे. त्या नंतर शहराचे विस्तारीकरण व नागरी वसाहती झपाट्याने वाढत असल्यामुळे नगरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.

पण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मुळा धरण ते विळद घाट आणि विळद घाट ते वसंत टेकडी पर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेमुळे आता नगर शहराचा पाणीप्रश्न सुटला आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

केंद्र व राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून अमृत पाणी योजनेचे काम मार्गी लागले असून, या कामाचा लोकार्पण सोहळा ३० डिसेंबर रोजी वसंत टेकडी येथे खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

कार्यक्रम स्थळाची नियोजना संदर्भात पाहणी केली यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. जगताप म्हणाले की, वसंत टेकडी येथील ५० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत अमृत पाणी योजनेचे पाणी सोडले आहे.

फेज टू योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध भागात पाण्याच्या टाक्या उभारल्या असून, त्यामध्ये अमृत पाणी योजनेचे पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नगरकरांना पूर्ण दाबाने आणि वेळेवर पाणी पुरवठा होणार आहे.

ही योजना पूर्ण झाल्याने अनेक वर्षाचा शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे. असेही ते म्हणाले. यावेळी जल अभियंता परिमल निकम, माजी नगरसेवक निखिल वारे, इंजि. गणेश गाडळकर, साहेबान जहागिरदार, इंजि. शिंदे, वैभव वाघ, सागर गोरे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe