अकोले- अकोले ते संगमनेर या सुमारे २२ किलोमीटरच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले तब्बल २१ स्पीड ब्रेकर वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या स्पीड ब्रेकरना कोणतेही संकेतचिन्ह अथवा पूर्वसूचना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनांचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
अतिरिक्त स्पीडब्रेकर
या मार्गावरील गाजरीचा ओढा, सुगाव बुद्रुक फाटा, मनोहरपूर, कळस बुद्रुक, पिंपळगाव कॉझिरा, कोकणेवाडी, चिखली, मंगळापूर यांसारख्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत. पण अनेक ठिकाणी शाळा अथवा अपघातप्रवण क्षेत्र नसतानाही स्पीड ब्रेकर टाकले गेले आहेत. परिणामी वाहनचालकांना अपघातांचा धोका वाढतो आहे.

ठेकेदार व विभागाकडून दुर्लक्ष
तिन वर्षांपूर्वी डांबरीकरण पूर्ण झालेल्या या रस्त्याच्या काही भागांवर नव्याने खड्डे पडले आहेत. अकोले शहरातील सेंट्रल बँकेसमोरील महालक्ष्मी कॉलनी परिसरात रस्त्याची अवस्था खडतर झाली आहे. यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन
राज्य मार्गावर स्पीड ब्रेकर टाकू नयेत असा न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही या मार्गावर नियमांचे उल्लंघन करत मनमानी पद्धतीने गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या अपघातांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
नागरिकांच्या मागण्या
सध्याची स्थिती पाहता वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही स्पष्ट मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये अनावश्यक स्पीड ब्रेकर हटवावेत, आवश्यक त्या ठिकाणीच ठेवावेत, सध्याच्या ब्रेकरवर पांढरे पट्टे मारावेत आणि त्यांची उंची नियंत्रित ठेवावी, अशा मागण्या पुढे येत आहेत. अपघातांची संख्या रोखण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.