राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज, अनेक दिवसांपासून रखडलेला तो सौर उर्जा प्रकल्प अखेर सुरू

आरडगाव सौर प्रकल्प अखेर कार्यान्वित झाला असून २ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आंदोलनामुळे हा प्रकल्प सुरू झाला. राजकीय दुर्लक्षामुळे प्रकल्प रखडला होता.

Published on -

राहुरी- तालुक्यातील आरडगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कार्यान्वित झाला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनांना याचे यश मानले जात आहे. या प्रकल्पामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्राजक्त तनपुरेंचा निर्णय

महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघात शेतकऱ्यांच्या हितासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. बाभूळगाव, वांबोरी आणि आरडगाव येथे सौर प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा केला गेला.

तनपुरे यांनी ऊर्जा राज्यमंत्री असताना मतदारसंघात सुमारे सहा सौर प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता देऊन त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. यापैकी आरडगावचा प्रकल्प हा एक महत्त्वाचा टप्पा होता. मात्र, सरकार बदलल्यानंतर नव्या सत्ताधाऱ्यांनी या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले आणि श्रेयवादाच्या राजकारणात हे प्रकल्प रखडले.

आंदोलनाचा इशारा

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर सौर प्रकल्पांची प्रगती थंडावली. बाभूळगाव प्रकल्पासाठी तनपुरे यांनी मंत्रालयात आवाज उठवताच तो सुरू झाला. त्यानंतर वांबोरी आणि आरडगाव प्रकल्पांसाठी त्यांनी विरोधी पक्षात असतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला.

वांबोरी येथे आंदोलनाचा इशारा देताच तिथला प्रकल्प सुरू झाला, तर आरडगाव येथे गेल्या महिन्यात रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर महावितरणला जाग आली. या आंदोलनात दहा दिवसांत प्रकल्प सुरू करण्याची मुदत देण्यात आली होती. अखेर मंगळवार, ८ एप्रिल रोजी हा प्रकल्प कार्यान्वित झाला आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यास सुरुवात झाली.

सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता

आरडगाव सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता ४ मेगावॅट असून, त्यासाठी २२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे दोन हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजेचा लाभ मिळणार आहे. मंगळवारपासून वीजपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असूनही वीजपुरवठा सुरू झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीसाठी विजेची प्रतीक्षा करावी लागत होती. तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाला पावले उचलावी लागली आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला.

प्राजक्त तनपुरे यांचे यश

माजी उपसरपंच सुनिल मोरे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरडगाव ग्रामपंचायतीने १६ एकर जमीन या प्रकल्पासाठी दिली होती. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला. मात्र, राजकीय उदासीनता आणि स्वार्थी वृत्तीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यास उशीर झाला. तनपुरे यांनी शेतकऱ्यांसाठी सातत्याने आवाज उठवला आणि त्यांच्या संघर्षामुळे आज हे स्वप्न साकार झाले. ग्रामस्थांनी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

या प्रकल्पामुळे १०० ट्रान्सफॉर्मरद्वारे दिवसा वीजपुरवठा होणार आहे. आरडगाव फीडर सकाळी ८:३० ते ४:३०, तर गणपतवाडी-मानोरी फीडर सकाळी ९:३० ते ४:३० पर्यंत चालणार आहे. आडगाव सबस्टेशनवरील सर्व फीडरांना याचा लाभ होईल, ज्यामुळे दोन तासांचे लोडशेडिंग बंद होणार आहे.

दिवसा सिंगल फेज पुन्हा सुरू होईल, तर आडगाव आणि मुसळवाडी गावठाणांना २४ तास वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News