Ahilyanagar News : वीजवाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे कारण देत शनिवारी चार तास सत्तावीस मिनिटे वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. पंधरा दिवसांपूर्वी, १९ एप्रिल रोजी उच्चदाब वीज वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणने तब्बल ८ तास ५० मिनिटे वीजपुरवठा बंद ठेवला होता.
पारनेरसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून तापमापकातील पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहचलेला आहे. उष्णतेच्या तडाख्यातच महावित रणकडून विविध दुरूस्त्यांच्या सबबीखाली वारंवार, दीर्घकाळ वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

दरम्यान, शनिवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजून २७ मिनिटापर्यंत वीज घालवण्यात आली. सध्या वाऱ्याचा वेगही मंदावला आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण खाली आलेले आहे.
त्यातच वीजपुरवठा बंद असल्याने वातानुकूलित यंत्रणा, पंखे, कुलर बंद राहिल्याने नागरिकांच्या हालाला पारावार राहिला नाही. डोकेदुखी, आम्लपित्ताचे वाढले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, श्वसन विकार असलेल्या रुग्ण कासावीस झाल्याचे चित्र होते. उष्णतेच्या तडाख्यामुळे विविध संसर्गजन्य रुग्णांमध्ये आजारांच्या वाढ झाली असल्याचे डॉ. बाळासाहेब कावरे यांनी सांगितले.
व्यवसायांवर परिणाम वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विविध व्यवसायांवर विशेषतः थंडपेय, आईस्क्रीम विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. उष्णतेच्या कडाक्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर तसेच बाजारपेठांमध्येही शुकशुकाट जाणवत आहे.