योगासनास खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून देशभरातील विविध स्पर्धांमध्ये अव्वल यश मिळवणार्या महाराष्ट्र संघाने दुसर्या आशियाई योगासन स्पर्धेतही जोरदार कामगिरी केली. एशियन योगासन व योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीत पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील योगासनपटूंनी २० सुवर्णपदकांची कमाई करताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
या स्पर्धेत राज्याचे नेतृत्त्व करणार्या आशिल्यान्गर जिल्ह्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांनी योगासनाच्या विविध प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करताना दहा सुवर्ण पदकांची लयलुट केली.पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता व उद्योग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्या उपस्थितीत विजयी खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

आशिया खंडातील १६ देशांमधील योगासन खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया, राज्यमंत्री रक्षा खडसे, योगऋषी स्वामी रामदेव, वर्ल्ड योगासनाचे सेक्रेटरी जनरल डॉ.जयदीप आर्य, योगासन एशियाचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सेक्रेटरी जनरल उमंग डॉन, योगासन भारतचे अध्यक्ष उदित सेठ व योगासन इंद्रप्रस्थचे अध्यक्ष रचित कौशिक यांच्या उपस्थितीत झाले.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करताना धु्रव ग्लोबल स्कूलच्या रोहन तायडे व प्रणव साहु यांनी ज्युनिअर गटात प्रत्येकी दोन सुवर्णपदके मिळवली. मुलींच्या गटात तृप्ती डोंगरे, नीरल वाडेकर व गार्गी भट यांनीही आपले वर्चस्व निर्माण करताना प्रत्येकी दोन सुवर्णपदकं आपल्या नावावर केली.
मुलांच्या सिनिअर गटात वैभव देशमुख आणि नीतिन पावले यांनी तर, मुलींच्या गटात तन्वी रेडिजनेही प्रत्येकी दोन सुवर्ण पदकं मिळवताना महाराष्ट्र संघाच्या विजयाची पताका फडकती ठेवली. महिलांच्या सिनिअर अ गटात महाराष्ट्राच्या सोनाली खरमारे, धनश्री लेकुरवाळे व ब गटात डॉ.शरयु विसपुते यांनी तर, पुरुषांच्या ब गटात भारत डेलीकर यांनी प्रत्येकी एक सुवर्ण पदकं मिळवताना महाराष्ट्र संघाच्या सुवर्ण पदकांचा तक्ता उंचावत नेला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ५० विद्यार्थ्यांनी योगवंदना सादर करताना उपस्थितांची मने जिंकली. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत योगासन खेळाडूंना शपथ देण्यात आली. एशियाखंडातील १६ देशांचा सहभाग असलेल्या या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्रसंघाने आपले वर्चस्व राखताना एकूण २० सुवर्ण पदके मिळवली.
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश मोहगांवकर, सचिव राजेश पवार व कोषाध्यक्ष कुलदीप कागडे यांनी या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेची तांत्रिक बाजू डॉ.निरंजन मूर्ति यांनी सांभाळली.