शिर्डी बायपास रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अपघातांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. दरम्यान आता एका स्कुल बसच्या अपघाताचे वृत्त हाती आले आहे. यात एक महिला ठार झाली असल्याची माहिती समजली आहे.
राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावाजवळील वाळकी फाट्यावर शुक्रवारी सकाळी लुना गाडी व कोऱ्हाळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कूल बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये वाळकी येथील वृद्ध महिला ठार झाली. नानूबाई तात्याबा पवार (वय ६५) असे या मृत महिलेचे नाव आहे.

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता श्री गणेश संकुलाच्या विद्यार्थ्यांची बस कोऱ्हाळे बायपास मार्गे मुलांना घेऊन जात होती. वाळकी फाट्यावर आली असता वाळकी गावातील तात्याबा तुकाराम पवार (वय ७०) हे आपली पत्नी नानुबाई तात्याबा पवार (वय ६५) हे लुना गाडीवर रेशन भरण्यासाठी जात होते.
कोऱ्हाळे बायपास क्रॉस करत असताना अचानक समोरून श्री गणेश शाळेची पिवळ्या रंगाची स्कूल बस क्रमांक १७ बी वाय ०२१८ अचानकपणे समोरून जोरात येऊन धडक दिली. त्यामुळे नानूबाई व पती तात्याबा हे रस्त्यावर खाली पडले. अपघात होताच दोघांनाही श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा शनिवारी मृत्यू झाला.
याविषयी राहाता पोलीस ठाण्यात मयत महिलेचा मुलगा सखाराम तात्याबा पवार यांनी फिर्यादी दिली. फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व हवालदार नरोडे करत आहेत.