अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- नागापूर एमआयडीसीतील झेन इलेक्ट्रॉनिक कंपनीत दरोडा टाकून 17 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पसार झालेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
सागर गोरख मांजरे (वय 25 शिवाजीनगर, कल्याणरोड, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना, श्रीरामपूर शहर व लोणी पोलीस ठाण्यात दरोडा, घरफोडी, चोरी, शस्त्र बाळगणे असे सात गुन्हे दाखल आहेत.
नुकताच त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी (मोक्का) लावण्यात आला आहे. 22 ऑक्टोबर 2021 रोजी सहा ते सात दरोडेखोरांनी नागापूर एमआयडीसीतील झेन इलेक्ट्रॉनिक कंपनीत दरोडा टाकून 17 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपींना यापूर्वी अटक केली असून सर्व आरोपीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील सागर मांजरे पसार होता. तो कल्याण रोड येथील घरी आला असल्याची खबर पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कामगिरी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम