….महाराजांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांनी नूतनीकरणासाठी एक छदाम देखील आमदार निधीतून दिलेला नाही !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या आमदारांनी त्यांच्या आमदार निधीतून एक छदाम देखील महाराजांच्या पुतळा व परिसर नूतनीकरणासाठी खर्च केलेला नाही.

मनपाने यासाठी रू. १.५५ लक्ष रकमेचा ठेका दिल्याची ऑर्डर दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी काढली होती. मनपाची ऑर्डरच काँग्रेसच्यावतीने समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली, असून प्रसारमाध्यमांना देखील ती शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी उपलब्ध करून दिली आहे.

पुतळा व परिसर नूतनीकरणासाठी त्यामुळे प्रत्यक्षात खर्च कुणी केला याची वास्तववादी माहिती समोर आली आहे. महानगरपालिका शहर अभियंता यांच्या स्वाक्षरीने दि. ५ जानेवारी रोजी एका खाजगी ठेकेदाराच्या नावाने पुतळा व परिसर नूतनीकरणाची ऑर्डर मनापाने जारी केली होती.

यामध्ये जीएसटी व्यतिरिक्त निविदा रक्कम रुपये १,५५,७८२ ठरविण्यात आली आहे. तसेच काम पूर्ण करण्याचा कालावधी दोन महिने नमूद करण्यात आला आहे. हा खर्च महापालिकेच्या पुतळे उभारणे सन २०२१-२०२२ या लेखा शीर्षकाखाली दाखवण्यात आला आहे.

सदर काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्यावर सोपवण्यात आली होती.

किरण काळे यांनी याबाबत म्हटले आहे की, महापालिकेच्या खर्चातून म्हणजेच अहमदनगरवासीयांच्या वतीने जमा करण्यात आलेल्या कररूपी पैशातून श्रद्धेय महाराजांच्या पुतळा व परिसराचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे.

यामध्ये आमदारांच्या आमदार निधीतून त्यांनी एक छदाम देखील उपलब्ध करून दिलेला नाही. मात्र महानगरपालिके सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खर्चातून केलेल्या कामात राजकारण करत आपली राजकीय पोळी त्यांनी भाजून घेतली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारा व्यक्ती अशा प्रकारे शिवप्रेमींची घोर फसवणूक ही कदापी करू शकत नाही. किंबहुना छत्रपतींच्या नावाचा दुरुपयोग करत नगर मनपाने रयतेच्या कररूपी पैशातून केलेल्या खर्चावर आपली राजकीय पोळी भाजणारा आमदार नगर शहराला लावला हे नगरकरांचे दुर्दैव आहे.

जनतेच्या रक्षणासाठी असणाऱ्या जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्या आमदाराकडून शिवप्रेमींनी व नगरकरांनी यापेक्षा दुसरी काय अपेक्षा करावी ? असा खरमरीत सवाल उपस्थित करत काळे यांनी पुन्हा एकदा आमदारांवर निशाणा साधला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe