वासन टोयोटाने दिली गरजू घटकांना नवदृष्टी 60 ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- वासन टोयोटाच्या वतीने शहरातील गरजू घटकांसाठी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून 60 ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.

यशस्वीपणे शस्त्रक्रिया होऊन शहरात परतलेल्या रुग्णांचा वासन ग्रुपच्या वतीने तरुण वासन, जनक आहुजा, अनिश आहुजा व फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी स्वागत केले.

अनेक वर्षापासून दृष्टीदोष असलेल्यांना शस्त्रक्रियेनंतर नवदृष्टी मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. नुकतेच वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजयजी वासन यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यामधील पहिल्या टप्प्यातील रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलला पाठविण्यात आले होते. या रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होऊन ते शहरात परतले आहेत.

तरुण वासन म्हणाले की, वासन ग्रुप सामाजिक बांधिलकी जपून व्यवसाय करत आहे. समाजातील गरजूंना नेहमीच मदतीचा हात देण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

कोरोनाकाळात सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. महागड्या आरोग्य सुविधांचा खर्च पेलवणे त्यांना शक्य नसून, त्यांना आधार देण्यासाठी या शिबीराचे आयोजन केले गेले.

वंचितांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे काम केल्याने समाधान मिळाले असल्याचे सांगितले. तसेच संपुर्ण महाराष्ट्रात ग्रुपने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती त्यांनी दिली.

जालिंदर बोरुडे यांनी वासन टोयोटाच्या वतीने दरवर्षी या शिबीराचे आयोजन करण्यात येते. कोरोनाकाळात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद होत्या. तर अनेकांना पैश्याची अडचण असल्याने या शिबीरास गरजूंचा चांगला प्रतिसाद लाभला.

गरजू घटकांना शिबीराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनिश आहुजा यांनी सामाजिक सेवाभाव जपून वासन टोयोटा योगदान देत आहे.

शोरूमच्या माध्यमातून रक्तदान व आरोग्य शिबीरसह गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. शिबीर यशस्वी होण्यासाठी दिपक जोशी, अविनाश आडोळकर, प्राची जामगावकर, कोमल पोळ यांनी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe