पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपिकाची निर्घृण हत्या ! बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्ये आढळला मृतदेह, घटनेने संपूर्ण अहमदनगर हादरलं

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ख्यातनाम आहे. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी दमदार कामगिरी केलेली आहे. सहकार क्षेत्राला जिल्ह्याने खऱ्या अर्थाने नवी दिशा दाखवली आहे. मात्र अलीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

दिवसाढवळ्या अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हाणामारी, कोयता हल्ला, गोळीबारी अशा गुन्हेगारीच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान संपूर्ण अहमदनगर शहर हादरवणारी आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे.

अहमदनगर शहरातील एमआयडीसी परिसरात पंचायत समितीमधील एका कनिष्ठ लिपिकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ माजली आहे. संपूर्ण शहर गुन्हेगारीमुळे हादरलं आहे.

बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्ये आढळला मृतदेह

हाती आलेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरातील सह्याद्री कंपनीच्या बंद पडलेल्या प्लांटच्या एका रूममध्ये एक मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांनी माहिती देताना सदर व्यक्तीचा खुन गळा आवळून आणि संपूर्ण चेहरा दगडाने ठेचून करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे या मयत व्यक्तीची ओळख पटत नव्हती. पण, मयताची ओळख त्याच्या खिशात सापडलेल्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून करण्यात आली आहे. यानुसार, संदीप कमलाकर शेळके उर्फ बाळू असे या मयत व्यक्तीचे नाव आहे.

संदीप गजानन कॉलनी नवनागापूर येथे हा मयत व्यक्ती वास्तव्याला होता. विशेष म्हणजे हा मयत व्यक्ती कोपरगाव येथील पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता.

पण, तीन वर्षांपासून हा व्यक्ती वरिष्ठांशी झालेल्या वादामुळे बडतर्फ झालेला होता. तेव्हापासून ही व्यक्ती नगरमध्येच होती.  दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वप्रथम पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला बोलवून आवश्यक असलेला प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे.

आता पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील आणि तेव्हाच या घटनेबाबत सविस्तर माहिती समोर येऊ शकणार आहे. या निर्घृण हत्येमुळे पुन्हा एकदा अहमदनगर शहर हादरले आहे.

दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याने सर्वसामान्य लोक खूपच घाबरलेले आहेत. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe