अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पित्याने आपल्या 9 वर्षे वयाच्या मुलाचे हातपाय बांधून काठीने मारहाण करुन त्याची हत्या केल्याची व तो झाडावरुन पडून मृत झाल्याचा बनाव करुन त्याचे दफन केल्याची घटना तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन वडिलांवर खुनाचा व पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 13 ऑक्टोबर 2021 रोजी सागर शंकर पवार (वय 9 वर्षे) या बालकाचा मृत्यू झाल्याची अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदर अकस्मात मृत्यूचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने माझ्याकडे तपास देण्यात आला.
सदर अकस्मात मृत्यूच्या चौकशी दरम्यान मृत्यू घडल्याचे घटनास्थळ पंचनामा करुन साक्षीदार राजू फकिरा गाडे (वय 52) रा. टोका-प्रवरासंगम याच्याकडे चौकशी करता त्याने सांगितले की,
मी नेवासा नगरपंचायत येथे नोकरीस असून प्रवरासंगमच्या पंपहाऊस येथे ड्युटीवर असताना तेथे जुन्या डाकबंगल्या शेजारी राहणार्या महिला पाण्यासाठी आल्या होत्या.
तेथे चर्चा चालू होती की, शंकर पवार याने त्याच्या मुलाचे हातपाय बांधून काठीने मारहाण केली. तो बेशुद्ध पडल्याने त्याला नेवासा येथे रुग्णालयात नेले परंतु तो मयत झाल्याने परत घेऊन येवून परस्पर दफनविधी केला.
त्यानंतर मुलाला दवाखान्यात घेऊन गेलेल्या गाडीचा चालक अनिल वसंत भागवत (वय 23) रा. प्रवरासंगम याच्याकडे चौकशी केली असता मुलगा झाडावरुन पडून जखमी झाल्याने त्याला दवाखान्यात घेवून जायचे असे सांगितल्याने नेवाशाला दवाखान्यात नेले होते.
डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितल्याने त्याचा मृतदेह प्रवरासंगम येथे परत आणून मी घरी गेलो असे सांगितले. साक्षीदार राजू फकिरा गाडे (वय 52) रा. टोका व अनिल वसंत भागवत (वय 23) धंदा-ड्रायव्हर रा. प्रवरासंगम या दोघांचे जबाब व टोका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या
प्राथमिक मतावरुन मयत सागर शंकर पवार (वय 9 वर्षे)यास वडील शंकर रामनाथ पवार रा. प्रवरासंगम ता. नेवासा याने 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते साडेसहाच्या दरम्यान दोरीने हातपाय बांधून अज्ञात कारणासाठी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले.
तसेच मयत यास उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय नेवासाफाटा येथे नेवून त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले असता पोलीस ठाण्याला कळवणे कायद्याने बंधनकारक असताना तसे न करता
मृतदेह परस्पर घेवून जावून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला.या फिर्यादीवरुन शंकर रामनाथ पवार याचेवर भारतीय दंड विधान कलम 302, 201, 176 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम