Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासुचा खून करून आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नी नूतन सागर साबळे (वय २३ वर्षे) तर सासु सुरेखा दिलीप दांगट (वय ४५ वर्षे) अशी मयतांची नावे असून सागर सुरेश साबळे आरोपीचे नाव आहे.
त्याने पत्नी आणि सासू झोपेत असतानाच डोक्यावर लोखंडी पहारीने वार करून हा खून केला असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. खून केल्यानंतर आरोपीने अहमदनगर तालुक्यातील धनगरवाडी येथील एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
![Ahmednagar News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Ahmednagar-Accident.jpg)
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की मुलीला बहिणीकडे सोडण्यासाठी आलेल्या नूतन यांच्या भावाला ही धक्कादायक घटना निदर्शनास आली. दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर भावाने राहुरी पोलिसांना माहिती दिली.
उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजु लोखंडे, उपनिरीक्षक खोंडे तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहचले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली.
यानंतर आरोपी सागर सावळे याने नगर एमआयडीसी हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कात्रड येथे पत्नी व सासूचा खून केल्यानंतर आरोपी सावळे फरार झाला होता. राहुरीचे विशेष पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक त्याचा शोध घेत होते. साबळे खून केल्यानंतर नगरच्या एमआयडीसी येथे आलेला होता.
येथील धनगरवाडी परिसरामध्ये तो काही काळ थांबला होता. या परिसरामध्ये असलेल्या चिंचेच्या झाडाला त्याने गळफास घेतला. त्याच्या जवळ कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्याने गुन्हा का केला, यासह अनेक प्रश्न अजूनही अनुत्तीर्ण आहेत