अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयात कोविड कक्षाला लागलेल्या आगीच्या वेळी काही नर्सेस उपस्थित होत्या. त्यांनी रुग्णांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, तेथे एकही डॉक्टर उपस्थित नसल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर येत आहे.
जर त्यावेळी त्या कक्षात तज्ज्ञ डॉक्टर असते, तर या दुर्घटनेतील रुग्णांचे जीव वाचवता आले असते, अशी खंत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी व्यक्त केली.
शेखर यांनी सोमवारी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने काही सूचना केल्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. या गुन्ह्याच्या संदर्भात काही जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
तर काहींचे जबाब नोंदवणे बाकी आहे. या दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी तांत्रिक विशेषज्ञांचे मत विचारात घेतले जात आहे. दुर्घटना झाली त्यावेळी तत्काळी खबरदारी घेतली असती तर आणखी काही रुग्णांचे प्राण वाचवता आले असते,
असे लक्षात येते. कक्षात काही नर्सेस उपस्थित होत्या. त्यांनी रुग्णांना वाचवण्याचे कसोशीने प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आले नाही, अशी खंतही शेखर यांनी व्यक्त केली.
जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडात बळी गेलेल्या ११ कोविडबाधित रुग्णांपैकी ५ जणांचा आगीत भाजून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या रुग्णांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार ही बाब स्पष्ट झाली आहे. तर सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. एकाची ओळख पटलेली नसल्याने त्याचे डीएनए रिपोर्ट जपून ठेवले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम