Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदी प्रा. भानुदास बेरड यांची नियुक्ती

Published on -

प्रदेश भाजपच्या महाविजय-२०२४, या अभियानात अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली असून, नियुक्तीचे पत्र प्रा. बेरड यांना पाठवले आहे. तीन राज्यांतील निवडणूक यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे.

महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ४५च्यावर जागा जिंकण्याचे ध्येय पक्षाने समोर ठेवले असून, त्यादृष्टीने संघटनात्मक बांधणीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर, नगर जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्षपद भषवलेल्या प्रा. बेरड यांच्यावर ३७- अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे.

नगर दक्षिण लोकसभेची खासदारकी सध्या भाजपकडेच असून, डॉ. सुजय विखे या मतदारसंघात पक्षाचे खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतही नगर दक्षिणेची जागा पक्षाकडे कायम राहण्याच्या दृष्टीने नवनियुक्त निवडणूक समन्वयक प्रा. बेरड यांना बूथ स्तरापासून संघटनात्मक काम करावे लागणार आहे.

मूळचे नगर तालुक्यातील दरेवाडीचे असणारे प्रा. बेरड मागील ३५ वर्षांपासून भाजपमध्ये संघटनात्मक काम करतात. सरुवातीला नगर तालकाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटन सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष, अशा पदांवर काम केल्यावर सध्या ते प्रदेश भाजपचे कार्यकारिणी व भाजपच्या सदस्य मतदार चेतना महाअभियानाचे उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागाचे संयोजक आहेत.

आता नव्याने पक्षाने त्यांच्यावर नगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदाची जवाबदारी दिली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे पक्षातून अभिनंदन होत आहे. दरम्यान, पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार व पक्षाचे महाविजय-२०२४ अभियान यशस्वी करणार, अशी प्रतिक्रिया प्रा. बेरड यांनी नियुक्तीवर बोलताना व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News