Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार, महिला बेपत्ता होणे आदी घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बदलापूर घटनेने सध्या महाराष्ट्र पेटलाय.
इतकेच नव्हे तर बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिल्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने जर लाखो मुली आणि महिला बेपत्ता होत असतील तर ही बाब गंभीर आहे.
राज्य सरकार नेमके करतेय काय ? बेपत्ता मुली आणि महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यांचे संरक्षण करणे ही जबाबदारी आहे याचे भान ठेवा, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर मागील सहा महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे जिल्ह्यातील पोलिसांनी ११३ गुन्हे नोंदवले आहेत. गेल्या वर्षभरात १५३ गुन्हे दाखल झाले होते.
मध्यंतरी एका अल्पवयीन मुलींना शाळेच्या छतावर नेऊन बांधून ठेवल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नाही. लग्नाचे आमिष दाखविणे, प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करणे, शाळेतून घरी जाताना रस्त्यात अडवून छेड काढणे, पाठलाग करत त्रास देणे, यासारख्या घटना घडत आहेत.
बदनामीच्या भीतीने अनेक मुली तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. शाळकरी मुली घर ते शाळा व्हॅन, बस, रिक्षातून प्रवास करतात. प्रवासात मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडतात. याशिवाय शेजारच्यांकडूनही अल्पवयीनवर अत्याचार झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.
पॉक्सो अंतर्गत गुन्हे
२०२२- १३७
२०२३ – १५२
२०२४- ११३