अहमदनगर शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु आता यातील अनेक समस्यांचे ग्रहण लवकरच सुटेल असे दिसते. याचे कारण म्हणजे नगर शहरातील १५ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न जसे कीजे, सावेडीमधील स्मशानभूमीसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी मनपा सरसावली आहे. यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सावेडी स्मशानभूमीच्या जागेचा.
मागील अनेक वर्षणापासून याचे भिजत घोंगडे आहे. परंतु आता हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सावेडी कचरा डेपोच्या जागेत सर्वसामान्यांसाठी स्मशानभूमी उभारण्यासाठी निधीचा प्रस्ताव पुढच्या स्थायी समितीच्या सभेत सादर करा, असे निर्देश सभापती गणेश कवडे व विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी बांधकाम विभागाला दिले. त्यामुळे आता कचरा डेपोच्या जागेत सर्वसामान्यांसाठी स्मशानभूमी होईल असे चित्र आता दिसते.

शहरातील दुसरा एक मुद्दा म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी चौथरा उभारणी व सुशोभीकरण. हे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. या करण्यासाठी ५५.७६ लाखांच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिलीये.
आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन १४ जानेवारी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा दिली आहे, त्यांचे विचार समाजासमोर यावे यासाठी त्यांचा नगर शहरात भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे.
सावेडी परिसरात लोकसंख्या दोन लाखांवर, स्मशानभूमीची समस्या मिटणार
सावेडी परिसरात लोकसंख्या २ लाखांवर पोहचली आहे. स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी ८ किमी लांब अमरधाममध्ये जावे लागते. परंतु आता बऱ्याच दिवसांपासूनचा स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न मिटला आहे.
सावेडी कचरा डेपोच्या जागेत स्मशानभूमी, उद्यान उभारणीसाठी मल्टीपर्पज आरक्षण प्रस्तावित करण्याचा निर्णय यापूर्वीच महासभेत घेण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी १५ गुंठे जागेत तृतीयपंथीयांना दफनभूमीसाठी जागा दिली आहे. आता याच ठिकाणी उर्वरित जागेत सर्वसामान्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
ठेकेदाराला रुपया भेटेना, लोकांची दैना फिटेना
पथदिवे, चेंबर दुरुस्ती, पाइपलाइन दुरुस्ती आदी प्रश्न शहरात रेंगाळले आहेत. त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. याकडे विरोधी पक्ष नेते बारस्कर, नगरसेवक विनीत पाऊलबुधे आदींनी लक्ष वेधले. बिले दिली जात नसल्याने ठेकेदार कामे करत नाहीत, याकडे बारस्कर यांनी लक्ष वेधले.
पथदिवेच्या ठेकेदाराला दोन वर्षांत एक रुपयाही दिलेला नाही. त्यामुळे काम होत नसल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे ठेकेदाराला रुपया भेटेना, लोकांची दैना फिटेना अशी अवस्था झाल्याचे दिसते.