Ahmednagar News : अहमदनगरमधील २२३ गावांना पुराचा धोका, लाईफ जॅकेटसह बोट तयार, पावसाळ्यासाठी प्रशासन सज्ज

Ahmednagarlive24 office
Published:
flood

Ahmednagar News :  मान्सून केरळात दाखल झाला आहे. तो आता लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने प्रशासन आता तयारीला लागले आहे. पूरप्रवण गावे यांची यादी करून त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरवात झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास २२३ गावे नदीकाठावर असून, अतिवृष्टी झाल्यास या गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात सर्व गोष्टी गृहीत धरून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना केल्या जात आहेत.

यासाठी लागणारे साहित्य जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. जिल्ह्यातील आठ प्रमुख नदी काठावरील २२३ गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जर अतिवृष्टी झाली तर पुरातून नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आताच तयारी करून ठेवली आहे.

जिल्ह्यात आठ बोटी उपलब्ध
पूरपरिस्थितीत नागरिकांच्या बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडे आठ बोटी उपलब्ध आहेत. यामध्ये अहमदनगर महापालिका, पोलिस प्रशासन, कोपरगाव नगरपरिषद, नेवासा तहसील, श्रीगोंदा तहसील अशा एकूण पाच रबर बोटी आहे,

तर नेवासा तहसील व कर्जत तहसील यांच्याकडे प्रत्येकी एक फायरबोट आहे. तसेच १८ मे रोजी आणखी एक इनफ्लॅटेबल रबर बोट जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.

प्रशासनाची तयारी
जिल्ह्यामध्ये सन २०२३ मध्ये एकूण ५०० स्वयंसेवकांना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. या आपदा मित्रांना लाईफ जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, गमबूट, रेनसूट, फर्स्ट अँड कीट बॉक्स, रोप, एलईडी टॉर्च, आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच जिल्हास्तरावर इनफ्लॅटेबल बोट, लाइफ जॅकेट, फ्लोटिंग स्ट्रेचर, लाईफबोया, आदी साहित्य जिल्हास्तरीय कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. जिल्ह्यातील पर्जन्याची दैनंदिन माहितीसाठी महावेध या प्रकल्प अंतर्गत ९७ महसूल मंडळांमध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नद्या व पूरप्रवण गावे
नदी                               गावे
गोदावरी                         ४०
प्रवरा                             १००
मुळा                             २४
भीमा                             २०
घोड                              ११
सीना                             २०
खैरी                              ५
म्हळुंगी                          ३

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe